Hot Posts

6/recent/ticker-posts

Aurangzeb's Tomb | औरंगजेबाच्या कबरीवरून उफाळला वाद; 'त्या' दोन आमदारांत जुंपली, काय आहे नेमकं प्रकरण?

 कबरीला पोलिसांचे कडेकोट संरक्षण


छत्रपती संभाजीनगर: मुगल शासक औरंगजेब याच्या कबरीवरून वाद वाढला आहे. खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर काढून टाकण्याच्या मुद्यावरून दोन्ही शिवसेना आमनेसामने आल्या आहेत. उबाठा गटाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे आणि शिंदे सेनेचे आमदार मंत्री संजय शिरसाट यांच्यात जुंपली आहे. लवकरच होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.


छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केलेली आहे. त्यावरून अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने औरंगजेबाची कबर न हटवल्यास बाबरी मशिदीसारखी पुनरावृत्ती करण्याचा इशारा दिला आहे. १७ मार्च रोजी विहिंप आणि बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही दिला आहे. नसता लाखोंच्या संख्येने कारसेवक संभाजीनगरसाठी कूच करतील असा इशाराही देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. दरम्यान, शिंदेनेने औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे, उबाठा गटाने इतिहास न तोडण्याचे म्हटले आहे. तर काँग्रेसने या मागणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. 

एकबोटेंना जिल्हाबंदी

२९ मार्च रोजी संभाजीने महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे औरंगजेबाची कंबर नष्ट करण्यासाठी येणार असल्याची कुणकुण जिल्हा प्रशासनाला लागली होती. त्यावरून १६ मार्च ते ५ एप्रिलपर्यंत एकबोटे आणि समर्थकांना जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत.

पोलिस बंदोबस्तात वाढ

दरम्यान, या मुद्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिक शांतता धोक्यात येऊ नये म्हणून पोलिसांकडून एसआरपीएफची एक तुकडी, १५ पोलिस कर्मचारी आणि दोन वरिष्ठ अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, पर्यटकांची कसून तपासणी केली जात असून, परिसरात दोन फिक्स पॉइंट्स उभारण्यात आले आहेत. पर्यटकांची कसून तपासणी केली जात आहे. काही पोलिस साध्या वेषातही तैनात करण्यात आले असून ते परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

बजरंग दलाकडून आंदोलनाचा इशारा

बजरंग दलने सरकारने लवकरच कबर हटवावी, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. ५ एप्रिलपर्यंत संभाजीनगर जिल्ह्यात बजरंग दल नेते मिलिंद एकबोटे हे येऊन कबर तोडणार असल्याची चर्चा होती. यावरून त्यांना नोटीस पाठवून शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर दुसरीकडे एकबोटे यांनी ही नोटीस खोटी असल्याचे म्हटले आहे.


एक राजा बाहेरून येतो, येथील महिलांवर अत्याचार करतो, लोकांना छळतो, संभाजी महाराजांचे हालहाल करून मारतो. त्याची आठवण आम्हाला कशाला हवीये. ती कबर काढून टाकावी. 

-संजय शिरसाट, पालकमंत्री, छत्रपती 


शिवरायांनी प्रतापगडावर अफजलखानाची कबर केली होती. अफजल खानाचा इथेच कोथळा काढला आणि त्याला इथेच गाडला हा इतिहास कळायला हवा यासाठीच ना. तसेच औरंगजेब इथे लुटायला आला होता मात्र त्याला इथेच गाडले हा इतिहास सांगता आला पाहिजे म्हाणून औरंगजेबाची कबर इथेच असायला हवी. इतिहास संपविण्याचे षडयंत्र या माध्यमातून होत आहे. 

-अंबादास दानवे,विरोधी पक्षनेते, विधानपरिषद