Hot Posts

6/recent/ticker-posts

Nandur Madhmeshwar Canal | कालव्याचे आवर्तन रखडले, आमदारांची पालकमंत्र्यांकडे मागणी

विहिरींसह जलसाठे पडले कोरडेठाक  


वैजापूर: नांदूर मधमेश्वर कालव्याचे आवर्तन लांबणीवर पडल्याने तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट झाला आहे. उन्हाची वाढती तीव्रता अन् त्यातच विहिरींनी तळ गाठल्याने नांमकातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी होत असताना नाशिक पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. दरम्यान यासंदर्भात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे नांमकातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे.


  गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असला तरी तालुक्यातील मोजक्याच प्रकल्पांत जलसाठा झाला होता. सुरवातीला झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठा झाला असला तरी तो साठा फार काळ टिकून राहिला नाही. यंदा फेब्रुवारी महिन्यांपासूनच उन्हाचा तडाखा जाणवायला सुरुवात झाली. परिणामी तालुक्यात बहुतांश भागात याच महिन्यात विहिरींनी तळ गाठला. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा, मका, गहू यासारखी पिके अर्ध्यावरच सोडण्याची वेळ आली. 

सध्याची परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्याची परिस्थिती गंभीर बनली आहे. पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून टॅंकर सुरू असले तरी ते पाणी वापरण्यासाठी मुबलक होत नाही. त्यामुळे नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे पिण्यासाठी आवर्तन सोडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरीत आहेत. परंतु नाशिक पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणामुळे आवर्तन रखडून आहे.

 कालव्याद्वारे आवर्तन सोडल्यास तालुक्यातील ४५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. आवर्तनातून पाझर तलावांसह सार्वजनिक व खासगी विहिरी भरल्यानंतर जनावरांसह नागरिकांच्याही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागतो. यासंदर्भात शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांचाही सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. परंतु निर्ढावलेले अधिकारी ही बाब गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत.

 वैजापूकरांनाही जाणवेल भीषण टंचाई 

एप्रिल महिन्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलेला आहे तर दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नारंगी मध्यम प्रकल्पात सध्या अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. हा जलसाठा काटकसरीने वापरल्यास मे महिन्यापर्यंत हा साठा पुरू शकतो. परंतु लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून प्रकल्पातून बेसुमार उपसा सुरू असल्यामुळे हे पाणी शहरवासियांना में महिन्यापर्यंत पुरेल की नाही? याबाबत साशंकता आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अवैध उपशाला वेळीच रोखले पाहिजे. अशी मागणीही शहरातील नागरिकांतून होत आहे.

काय आहे आमदारांच्या पत्रात?

सामाजिक न्याय व  पालकमंत्री संजय शिरसाट यांना आमदार रमेश बोरनारे यांनी लेखी दिले आहे. वैजापूर विधानसभा मतदारसंघात अगदी कमी प्रमाणात पाऊस झालेला आहे. कमी पर्जन्यमानामुळे नांदूर  मधमेश्वर कालवा क्षेत्रातील पाणीपातळी कमी होत आहे. परिणामी कालवा क्षेत्रातील तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून सर्व गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु झाले आहे. सध्या ०.९० टी.एम.सी. पाणी शिल्लक असून लाभक्षेत्रासाठी अतिरिक्त ०.९० टी.एम.सी. पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सदरील आवर्तन १.८० टी.एम.सी. सोडणे गरजेचे आहे. गोदावरी डावा कालवा व नांदूर मधमेश्वर कालवा या दोनही कालव्यांचे आवर्तन एप्रिल मध्ये सोडल्यास वहनव्यय व पाणी उपसा कमी होईल. तरी नांदूर मधमेश्वर कालव्यास उन्हाळी हंगामाचे (पिण्याचे पाणी) १.८० टी.एम.सी. आवर्तन एप्रिलमध्ये सोडण्याची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. असे त्यांनी नमूद केले आहे. याच पत्रांच्या प्रती जिल्हाधिकाऱ्यांसह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.