अपहरण करणाऱ्याला ठोकल्या बेड्या
वैजापूर: शहरातील लाडगाव रस्त्यावरून एका तीन वर्षीय मुलाचे अपहरण करून पळून जात असलेल्या एका आयशर चालकाला नातेवाईकांनी लगतच्या कोपरगाव तालुक्यात अडवून पकडले. १० मे रोजी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी आयशर चालकाविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव भानुदास कांदळकर (रा. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आयशर चालकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माधुरी फुलारे या शहरातील लाडगाव रस्त्यालगत पती, सासू, मुलगा व आई यांच्यासोबत रहिवासास आहेत.
दरम्यान शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास त्यांचा तीन वर्षांचा मुलगा कुणाल फुलारे हा घरासमोरील अंगणात खेळत होता. यावेळी माधुरी या घरातील काम आवरत होत्या तर त्यांच्या आई लताबाई या चिमुकल्या कुणालवर लक्ष ठेवण्यासाठी घरा बाहेरच उभ्या होत्या. लताबाई थोड्या वेळ बाजू गेल्या. नेमके याचवेळी कुणालला कोणीतरी उचलून नेल्याचे त्यांना समजले.
काही क्षणात त्यांनी आरडाओरड सुरू केली. यावेळी त्यांनी परिसरात चौकशी केली असता 'कोपरगावकडे जाणाऱ्या एका आयशर चालकाने तुमच्या नातवाला उचलून नेल्याचे' आजूबाजूच्या नागरिकांनी लताबाई यांना सांगितले. नेमके याचवेळी प्रसंगावधान दाखवत लताबाई यांनी संवत्सर (ता. कोपरगाव) येथील त्यांच्या एका नातेवाईकाला फोन करून सदरील आयशरचे वर्णन सांगितले.
त्यानुसार त्यांच्या नातेवाईकांनी आयशर (क्रमांक एम.एच. १४ बी.जे. ४१३२) अडवून चालकाच्या ताब्यातून कुणालला सुरक्षितरित्या ताब्यात घेतले. तोपर्यंत त्या ठिकाणी वैजापूर पोलिस देखील पोहोचले होते. याप्रकरणी माधुरी फुलारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Social Plugin