प्रोत्साहनभत्ता अजूनही प्रलंबित!
वैजापूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) अर्ज भरण्यासाठी अंगणवाडीसेविकांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता/मोबदला (Incentive Allowance) देण्याचे जाहीर करूनही सदर भत्ता/मोबदला अंगणवाडी सेविकांना शासनाने दिलेला नाही. यामुळे 'लाडकी बहिण तुपाशी अन् अंगणवाडीताई मात्र उपाशी' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने आणलेल्या 'लाडकी बहिण' योजनेमुळे महायुतीला 'प्रोत्साहन' मते मिळाली. मात्र, या योजनेच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकाच उपेक्षित आहेत. शासनाने योजनेचे अर्ज भरणाऱ्या अंगणवाडी सेविकांना एका लाभार्थ्यामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते. राज्य शासनाने माहे जुलै ते डिसेंबर २०२४ मध्ये वा त्यासुमारास माझी लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रत्येक अर्जामागे ५० रुपये प्रोत्साहन भत्ता/मोबदला देण्याचे जाहीर करूनही सदर भत्ता/मोबदला अंगणवाडी सेविकांना अद्याप मिळालेला नसल्याचे निदर्शनास आले आहे.
लाडकी बहिण योजनेसाठी द्यायच्या प्रोत्साहन भत्याचा प्रस्ताव आयुक्त, महिला व बालविकास पुणे यांनी महिला बालविकास विभागामार्फत राज्य शासनाकडे पाठविला होता. तो शासनस्तरावर मार्च २०२५ पर्यंत प्रलंबित होते. नुकतेच शासनाने ३१ कोटी ३३ लाख रुपये महिला व बालविकास आयुक्तालयास वितरित केले आहे. मात्र अद्यापपर्यंत अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा प्रोत्साहन भत्ता त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.
योजना ठरली 'गेमचेंजर'
विधानसभा निवडकीपूर्वी लाडकी बहिण योजनेचा लाभ जास्तीत - जास्त महिलांना देता यावा हा महायुती सरकारचा मूळ उद्देश होता. शासनाच्या आदेशानुसार नियमित काम संभाळत अंगणवाडी सेविकांनी अर्ज भरून घेण्याची जबाबदारी नेटाने पार पाडली. गावागावांत जाऊन महिलांचे अर्ज भरून घेतले. महायुती सरकारला सत्तेत आणण्यासाठी निर्णायक भूमिका बजावलेल्या लाडक्या बहिणांना तर नियमित लाभ दिला जात आहे. परंतु लाडक्या बहिणींना अर्ज भरुन त्यांना निकषात बसवित पात्र ठरविणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस अद्यापही उपेक्षितच आहे.
Social Plugin