Hot Posts

6/recent/ticker-posts

Nandur Madhmeshwar canal | दिलासादायक: 'नांमका'त सोडले; आता वैजापूरच्या 'या' प्रकल्पात सोडणार पाणी

वैजापूरच्या 'नारंगी'तही सोडणार पाणी

 वैजापूर: नांदूर मधमेश्वर कालव्याद्वारे (Nandur Madhmeshwar canal) वैजापूर व गंगापूर तालुक्यांसाठी ६०० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. साधारणतः २२ दिवस हे आवर्तन सुरू राहणार असून या आवर्तनातून दोन टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे. पायथा ते माथा या नियमानुसार पाणी वाटप होणार आहे. आवर्तन तालुक्यात दाखल झाले असून गंगापूर तालुक्यात प्रथम पाणी वाटप होणार आहे. दरम्यान शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पातही पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार आहे. यासंदर्भात शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी 'नांमका'सह नारंगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यामुळे वैजापूकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.


गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्यामुळे या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये मुबलक प्रमाणात जलसाठा झाला आहे. याशिवाय जायकवाडी प्रकल्पातही ८० टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पातून केव्हाही विसर्ग सोडला जाण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातील पाणी गोदावरीत सोडल्यानंतर ते जायकवाडी जलाशयात पोहोचते. परंतु आता यात ८० टक्के जलसाठा झालेला आहे. अशा परिस्थितीत आता नांदूर मधमेश्वर कालव्यात सोडण्याशिवाय पर्याय नाही. 

वैजापूर येथील नारंगी मध्यम प्रकल्प 

शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे यांनी पालकमंत्र्यांसह नाशिक पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला. त्यांच्या रेट्यामुळे नाशिक पाटबंधारे विभागाला पाणी सोडणे भाग पडले. याशिवाय नांमकाचे कार्यकारी अभियंता राकेश गुजरे यांनीही पाटबंधारे विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला. 

नांदूर मधमेश्वर कालवा 

दरम्यान नांमकातून सोडलेले आवर्तन २२ दिवस सुरु राहणार असून पायथा ते माथा या नियमानुसार आधी गंगापूर तालुक्यातील गावांना हे पाणी सोडण्यात येणार असून त्यानंतर वैजापूर तालुक्यातील गावांना कालव्याचे पाणी मिळणार आहे. विशेष म्हणजे म्हणजे आता खरिप हंगामात सोडलेले आवर्तन रब्बी हंगामात वजा होणार नाही. या आवर्तनातून दोन्ही तालुक्यांतील गावागावांतील सार्वजनिक विहिरींसह पाझर तलाव व जलसाठे भरण्यास मोठी मदत होणार आहे. 

सध्या पावसाळा सुरू असला तरी अजूनही अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने जलसाठे तहानलेलेच आहे. अशा परिस्थितीत नांदूर मधमेश्वर कालव्यातून सोडण्यात आलेले आवर्तन दोन्हीही तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासादायक ठरणार आहे. 

 'पालखेड'चे सोडणार पाणी

 नाशिक जिल्ह्यातील धरणक्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे पालखेड धरणातही मुबलक प्रमाणात जलसाठा झाला आहे. त्यामुळे पालखेड धरणातील पाणी डाव्या कालव्यातून वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात (Narangi Dam Vaijapur) सोडण्यात येणार आहे. धरणातून नारंगी मध्यम प्रकल्पात किमान ४० टक्के जलसाठा होणे अपेक्षित आहे. येत्या दोन दिवसांत पाणी सोडण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

वैजापूरकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी अपेक्षित जलसाठा झाला नाही. परंतु शहरवासीयांची तहान भागली. यंदा पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले. परंतु अजूनही प्रकल्पात समाधानकारक जलसाठा झालेला नाही. नाशिक दारणा समूहासह पालखेड धरणात सध्या चांगला जलसाठा झालेला आहे. दरम्यानच्या काळात पालखेड धरणातून नारंगी प्रकल्पात पाणी सोडण्यात आले होते. दोन ते तीन दिवस पाणी सुरू होते. परंतु पाणी अचानक बंद करण्यात आले. परंतु आता येत्या दोन ते तीन दिवसांत नारंगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याबाबत निर्णय होऊन पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान  यापूर्वीच्या कालव्याची अवस्था बिकट होती. ठिकठिकाणी फुटणाऱ्या कालव्याच्या कामासाठी आमदार रमेश बोरनारे यांनी ३८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने कालव्याची वहनक्षमता वाढली आहे. शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे नाशिक जिल्ह्यावर अवलंबून असल्याने पाटबंधारे विभागाकडून जेव्हा आवर्तन सोडण्यात येते. तेव्हाच शहरवासीयांची तहान भागते. पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडल्यास शहरवासीयांसह लाभक्षेत्रातील २० गावांतील शेतकऱ्यांना मात्र मोठा दिलासा मिळणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील धरण समूहात मोठ्या प्रमाणात जलसाठा झाल्याने नांदूर मधमेश्वर कालव्यासह नारंगी मध्यम प्रकल्पात पाणी सोडण्याची मागणी पालकमंत्र्यांसह नाशिक पाटबंधारे विभागाशी पत्रव्यवहार केला होता. 'नांमका'त पाणी सोडले. आता 'नारंगी'बाबतही लवकरच म्हणजे दोन दिवसांत निर्णय होईल.

- प्रा. रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर 

नांदूर मधमेश्वर कालव्यात आवर्तन सोडण्यात आले असून साधारणतः २२ दिवस आवर्तन सुरू राहणार असून दोन टीएमसी पाणी मिळण्याची शक्यता आहे. या आवर्तनापासून कुणीही वंचित राहणार नाही. सर्वांनाच मुबलक पाणी मिळेल. याशिवाय शहरानजीकच्या नारंगी मध्यम प्रकल्पातही येत्या दोन दिवसांत पाणी सोडले जाण्याची शक्यता आहे.

- राकेश गुजरे, कार्यकारी अभियंता, 'नांमका' वैजापूर