Hot Posts

6/recent/ticker-posts

Woman's Delivery | ..अन् 'तिची' जनावरांच्या दवाखान्यात झाली प्रसूती.! वैद्यकीय पथक धावले मदतीला

पतीने मनोरुग्ण पत्नीला सोडले एकटे

वैजापूर: सरकारी वैद्यकीय दवाखाना समजून प्रसूतीसाठी मनोरुग्ण पत्नीला नवऱ्याने थेट पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आवारात सोडले. सुनसान जागेवर रात्री ती एकटीच. परिसरात घाणीचे साम्राज्य, अक्षरशः उकिरडा झालेल्या जागेवर रात्री तीन वाजेच्या सुमारास प्रसूती होऊन तिने गोंडस बाळाला तिने जन्म दिला. दरम्यान महिलेची प्रसूती झाल्याची भणक लागताच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह परिचारिका व अन्य कर्मचारी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धावून गेले अन् तिच्यावर तातडीने उपचार केले.


याबाबत अधिक माहिती अशी की, २६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील भटाणा येथील एका २५ वर्षीय महिलेला तिच्या पतीनेच सरकारी वैद्यकीय दवाखाना समजून शहरातील येवला रस्त्यावरील तालुका लघू सर्व चिकित्सालयाच्या आवारात (जनावरांचा दवाखाना) सोडून तो चालल्या गेला. ती गर्भवती होती अन् तिचे दिवसही पूर्ण झाले होते. घाणीच्या साम्राज्यात अन् निर्जनस्थळी ती एकटीच होती. रात्री तीन वाजेच्या सुमारास तिला प्रसव वेदना सुरू होऊन तिने गोंडस बाळाला (मुलगा) जन्म झाला. 


त्याचवेळी बाळाच्या रडण्याच्या आवाजाने तेथे जवळपास असलेल्या काहींचे लक्ष वेधले गेले. तेथे गेल्यानंतर त्यांना प्रकार दिसला. त्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात याबाबत माहिती कळवली. माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर मुंडे, परिचारिका व अन्य कर्मचारी इंस्टुमेंट, रुग्णवाहिकेसह तेथे गेले. परंतु तोपर्यंत तिची प्रसूती झालेली होती. मातीत पडलेले बाळ अणि त्याच अवस्थेत असलेल्या महिलेला रुग्णवाहिकेत टाकून उपजिल्हा रुग्णालयात आणले. तेथे दोघांवरही उपचार करण्यात आले.

 साधारणतः पहाटे चार वाजेच्या सुमारास वाहेद पठाण व सहकाऱ्यांनी तिला बाळासह रुग्णवाहिकेतून भटाणा येथील तिच्या घरी सोडण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयातील डाॅ. मुढेंसह त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या तत्परतेने महिला व बाळाला वेळेत उपचार मिळाले. बाळ आणि बाळंतीण सुखरूप असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

 कात्री घेऊन मारण्याचा प्रयत्न 

दरम्यान महिलेची प्रसूती झाल्याची माहिती मिळताच डॉ. सुधाकर मुंडे व कर्मचारी जनावरांच्या दवाखान्यात पोहोचले खरी. त्याचवेळी त्या महिलेने परिचारिकेच्या हातातील कात्री घेऊन तिच्या मागे लागली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. याशिवाय तिने कर्मचाऱ्यांना मारहाणही केली. विशेष म्हणजे प्रसूतीनंतर त्या महिलेने नाळ स्वतःच्या हाताने काढून टाकली.

आम्हाला महिला प्रसूत झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सर्व यंत्रणेसह हजर झालो. तेथून उपजिल्हा रुग्णालयात आणून दोघांवरही उपचार करून घरी रवाना केले. ती महिला मनोरुग्ण असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे ती परिचारिकेच्या मागे कात्री घेऊन लागली असावी. परंतु घरी गेल्यानंतर तिचा अग्रेसिव्हपणा कमी झाला.

-डाॅ. सुधाकर मुंढे, वैद्यकीय अधिकारी, वैजापूर