समृद्धी महामार्गावरील घटना
वैजापूर: भरधाव जाणाऱ्या आयशर ट्रकने कंटेनरला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघेजण जागीच ठार झाल्याची घटना २६ मे रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील डवाळा शिवारात घडली. दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणारे दोन कंटेनर उभे करून या दोन वाहनांच्यामध्ये महामार्गावर चालकांसह क्लिनर जेवण करीत असतानाच आयशरने धडक दिली अन् या घटनेत आयशर व कंटेनर चालक अशा दोघांचा मृत्यू झाला.
मोहंमद जावेद (२६ कंटेनर चालक रा. झारखंड) व आयशर चालक (४० ) असे दोघेजण या घटनेत ठार झाले तर मोहंमद इकबाल हुसेन (३० रा. झारखंड) असे जखमीचे नाव आहे. आयशर चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर दोन कंटेनर एकमेकांच्या मागे उभे करून या दोन्हीही वाहनांचे चालक वाहनांच्या मधोमध जेवण करीत असतानाच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव येणाऱ्या आयशर ट्रकने उभ्या कंटेनरला धडक दिल्याने दोन्हीही कंटेनरच्या मधोमध जेवण करीत असलेला मोहंमद जावेद या चालकाचा दबून मृत्यू झाला तर आयशर चालकालाही गंभीर दुखापत होऊन तो जागीच गतप्राण झाला.
या घटनेत अन्य एकजण गंभीर जखमी झाला आहे. आयशर चालकाचे नाव मात्र समजू शकले नाही. अपघातानंतर त्यांना रुग्णवाहिकेतून वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु यातील दोघांनाही तपासून डाॅक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
Social Plugin