ठाण्यासमोर 'राडा' करण्याचा पडतोय पायंडा
वैजापुरात कुत्रा भुंकण्याचे कारण झाले अन् दोन समूह पोलिस ठाण्यासमोर आमनेसामने आले. यानंतर साधारणतः दोन ते तीन तास धुमश्चक्री झाली. पोलिसांनी 'प्रसाद' देऊन वेळीच वठणीवर आणले. त्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन! पण असे प्रकार का होतात? आता प्रशासनाने यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. मुळात एखाद्या घटनेनंतर एवढा मोठा जमाव जमतो अन् पोलिसांनी लाठीचार्ज करण्यासाठी पुढे सरसावे लागते. मंगळवारी ठाण्यासमोर चित्र बघावयास मिळाले. ते आगामी काळात चिंताजनक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाने वेळीच अशा असामाजिक तत्वांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
६ मे रोजी शहरात लहान मुलांवर कुत्रा भुंकला अन् त्याचे पर्यवसान थेट दोन गटांत हाणामारीत झाले. पाहता - पाहता हा वाद गल्लीतून थेट सार्वजनिक रस्त्यावर येऊन पोलिस ठाण्यात पोहोचला. या वादामुळे दोन समूहातील गट पोलिस ठाण्यासमोर आमनेसामने आले. त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन घेत जमावावर लाठीचार्ज करावा लागला. मुळात पोलिसांनी ही ॲक्शन का घ्यावी लागली? तत्पूर्वी जमावाने ठाण्यासमोर घोषणाबाजी करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी काही वेळातच ही दहशत मोडीत काढून सर्वांना हुसकावून लावले. परंतु असे असले तरी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दंगाकाबू पथकास पाचारण करण्यात आले होते.
सायंकाळनंतर शहरात तणावपूर्ण शांतता होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून निरीक्षण केल्यास एक बाब नेहमीच समोर येत आहे. कुणाचेही वाद अथवा भांडणं झाले तरी जमावाने पोलिस ठाण्यात येऊन घोषणाबाजी करून पोलिसांवर दबाव आणण्याचा केविलवाणा प्रयत्न काही असामाजिक तत्त्व करीत आहेत. मुळात या जमावाचे नेतृत्वही हेच असामाजिक तत्त्व करताना दिसतात. जो मुळ फिर्यादी अथवा तक्रारदार बाजूला राहतो अन् हे उपद्रवी घटक समोर येऊन पोलिसांशी युक्तिवाद करून प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न करतात.
त्या दिवशीही तेच झाले आणि यापूर्वीही हेच घडत आले. लहानसहान घटनांमुळे अख्ख्या शहराला वेठीस धरण्याचे प्रकार सुरू आहे. परिणामी याचा शहरातील बाजारपेठेबरोबरच ग्रामीण भागातील नागरिकांवर परिणाम होताना दिसून येत आहे. या 'मुठभर' असामाजिक तत्त्वांमुळे शहराची कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे. हे 'असामाजिक तत्त्व' कोण आहेत? वैजापूरकर या तत्त्वांशी चांगले परिचित आहेत. असे असतानाही पोलिस यंत्रणा या तत्त्वांशी अपरिचित आहे का? अशी शंका आता शहरवासीयांना वाटू लागली आहे.
शहराची शांतता बिघडविणारे कोण? हे सर्वश्रुत असतानाही पोलिस व प्रशासनाने मुग गिळून गप्प बसायचे कारण काय? हे एक न उलगडलेले कोडं आहे. कुण्या लुंग्यासुंग्यामुळे शहर असंच धुमसू द्यायचे अन् प्रशासनाने पाय लावून पळायचे! हे किती दिवस चालणार? पोलिसांवर दगडफेक करण्यापर्यंत मजल जाते म्हणजे याचा अर्थ काय? त्यांची हिंमत कुठपर्यंत गेली? याबाबत पोलिसांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
शांतता भंग करणाऱ्यांचा एकदाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. वाद, भांडणं होत असतात. यापुढेही होत राहतील. परंतु याचे भांडवल करून जी मंडळी जातीय रंग देऊन पोळी भाजण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा डाव हाणून पाडला पाहिजे.
वाद झाल्यानंतर पोलिस ठाण्यात जमाव होऊन 'राडा' करण्याचा जणू पायंडा पडत चालला आहे. अशा शक्तिंची दहशत मोडीत काढण्याची आता गरज आहे. सन २००२ मध्ये झालेल्या दंगलीलाही अशाच छोट्यामोठ्या घटनांची किनार होती. त्याचे पर्यवसान नंतर थेट दंगलीत झाले. यात शहराची अपरिमित हानी झाली. हा कटू अनुभव शहरवासीयांना असल्यामुळे आता ती पुनरावृत्ती नको आहे.
वेळीच नांग्या ठेचा!
आगामी काळात शहरात सामाजिक सलोख्यासह शांतता नांदावी,असे वाटत असेल तर पोलिस व प्रशासनाने अशा असामाजिक तत्वांच्या वेळीच नांग्या ठेचून आवर घालण्याची गरज आहे. परंतु अशा घटकांसमोर प्रशासन नांग्या टाकणार असेल तर याचे परिणाम अख्ख्या वैजापूरकरांना भोगावे लागेल. एवढे मात्र नक्की!
Social Plugin