खंडाळा येथील खळबळजनक घटना
वैजापूर: पूर्व वैमनस्यातून तुंबळ हाणामारी होऊन एका २३ वर्षीय तरुणाला चाकूने वार करून संपवलं तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथे घडली. दरम्यान घटनेनंतर सर्वांना वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर नातेवाईकांनी तोडफोड केली. या वृत्तास डाॅक्टरांनी दुजोरा दिला आहे.
मोईन मुख्तार शाह (२३) असे या घटनेत ठार झालेल्याचे नाव आहे तर अबरार आरिफ शेख (२४), शोएब आरिफ पठाण (२३) व अबू बकर आरिफ शेख (२२ ) सर्व रा. खंडाळा अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, खंडाळा येथील दोन गटांत गेल्या काही दिवसांपासून वाद होता. हे दोन्हीही गट खंडाळा गावातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलसमोर एकमेकांसमोर येऊन भिडले अन् त्याचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले.
या झटापटीत मोईन शाह याच्यावर चाकूने वार केल्याने तो गतप्राण झाला तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाले आहे. घटनेनंतर सर्वांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर नातेवाईकांनी तोडफोड केल्याने एकच गोंधळ उडाला. या वृत्तास उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दुजोरा दिला आहे. रुग्णालयात मोठी गर्दी झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आले.
घटनेचे मूळ कारण काय?
दरम्यान ही घटना नेमक्या कोणत्या कारणाने झाली व मारेकरी कोण? याबाबत खुलासा होऊ शकला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान अबरार शेख व शोएब पठाण या दोघांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे.
Social Plugin