Hot Posts

6/recent/ticker-posts

Caught Gutkha | टेंपोत ६३ लाखांचा गुटखा आणला अन् पोलिसांच्या जाळ्यात अडकला! कुठं झाली कारवाई?

वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वैजापूर: राज्यात बंदी असलेला गुटखा अमरावतीहून-मुंबईकडे वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पो चालकावर वैजापूर पोलिसांनी २० ऑगस्ट रोजी कारवाई करून ६३ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 
श्रीमन छोटेलाल प्रसाद (गोंड) (गाव पकडी, पोस्ट फेफाणा, ता.जि. बलिया राज्य उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, गंगापूरकडून- वैजापूरमार्गे- कोपरगावकडे आयशरने (क्रमांक एमएच ०४ एलई ३९५९) महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा भरून अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने येत आहे. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्यासह पथकाने वैजापूर ते कोपरगाव रोडलगत असलेल्या कादरी मोटर गॅरेजसमोर बुधवारी सकाळच्या सुमारास आयशर वाहन अडविले.

 पथकाने वाहनाची तपासणी केली असता वाहनात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला वेगवेगळ्या कंपनीचा ६३ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांना मिळून आला. यावेळी पोलिसांनी चालकाला त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव छोटेलाल प्रसाद (गोंड) (गाव पकडी, पोस्ट फेफाणा, ता.जि. बलिया राज्य उत्तर प्रदेश) असे असल्याचे सांगत हा गुटखा आपण अमरावतीहून- मुंबईकडे नेत असल्याचे सांगितले. लगेचच पथकाने ६३ लाखांचा गुटखा व २० लाख रुपयांचे वाहन असा एकूण ८३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार  राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, युवराज पाडळे, आर. आर. जाधव, हवालदार अमोल राजळे, योगेश झाल्टे,  कुलदीप नरवडे, प्रशांत गीते, अजित नाचन, सचिन रत्नपारखे यांच्या पथकाने ही कारवाई केली.