एसआरपीसह दंगाकाबू पथक तळ ठोकून
वैजापूर: कुत्रा भुंकण्याच्या कारणावरून दोन गटांत लाथाबुक्क्यांसह लाठ्याकाठ्यांनी तुंबळ हाणामारी झाल्याची घटना ६ मे रोजी शहरात घडली. याप्रकरणी परस्परविरोधी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेची वार्ता शहरात पसरताच दोन्हीही गटांतील समुदाय पोलिस ठाण्यासमोर जमा होऊन यातील एका गटाने जोरदार घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करून जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात उपविभागीय अधिकाऱ्यांनी सात दिवस जमावबंदी आदेश लागू केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरातील बजरंग चौकातील रहिवासी अभिषेक नंदलाल दाढे यांच्या पाळीव कुत्रा घरासमोर बांधलेला असताना एका लहान मुलाने जाणीवपूर्वक हातवारे करून केल्याने तो भुंकू लागला. त्यानंतर दाढे यांनी त्याला समजावून सांगत असताना त्याने 'हा कुत्रा मला रोज भुंकतो. त्यामुळे मी त्याला फावड्याने मारून टाकीन. एवढेच तर त्याने दाढे यांच्या आईला शिवीगाळही केली. काही वेळाने आरेफ कुरेशी, फारेद कुरेशी, जाहेद कुरेशी व अन्य चार जणांनी दाढे यांना घरातून ओढत लाथाबुक्क्यांसह लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या त्यांच्या आईसह बहिणीला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. याप्रकरणी दाढे यांच्या फिर्यादीवरून उपरोक्त व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान अजीज लतीफ कुरेशी (रा. येवला रोड) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या मुलासह भाचा बाहेरून घरी येत असताना बजरंग चौकात त्याच्यांवर कुत्रा भुंकू लागल्याने त्यांनी त्याला दगड मारला. त्यांनी दगड मारला म्हणून दाढेसह घरातील सदस्यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांसह काठीने दोघांना मारहाण केली. याप्रकरणी दाढेसह कुटुंबातील सदस्यांविरुध्द वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यासमोर दोन्ही गटांतील समुदाय जमल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांनी वेळीच जमावावर लाठीचार्ज करून जमावाला पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दंगाकाबू पथकास पाचारण केले होते. परंतु पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळेंसह सहकाऱ्यांनी वेळीच जमावावर नियंत्रण मिळविल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्यस्थितीत शहरात राज्य राखीव दलाच्या तुकडीसह दंगाकाबू पथक शहरात तळ ठोकून आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात सात दिवस जमावबंदी आदेश लागू करण्यात आले असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
पोलिसांवरही दगडफेक
पोलिस ठाण्यासमोर असलेल्या जमावाने पोलिसांवरही दगडफेक केली. परंतु यात कुणीही जखमी झाले नाही. पोलिस ठाण्यासमोर हजार ते दीड हजार नागरिकांचा जमाव जमला होता.
Social Plugin