पाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत; तिघेजण फरार
वैजापूर | सत्यार्थी नेटवर्क
दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या परप्रांतीय दरोडेखोरांचा सिनेस्टाईलने पाठलाग करीत वैजापूर पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहे. ०४ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई केली. या टोळीतील तिघेजण पोलिसांना चकवा देऊन फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्याच्या साहित्यासह कार असा एकूण चार लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
मोहमंद कैफ नजमोद्दीन (रा.उलेटा ता.फिरोजपूर जि. नुहु राज्य हरियाणा) आझाद इमरु खान (रा. झारोकशी ता. पुनहना जि. नुहु राज्य हरियाणा) अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, कार व रोकड असा एकूण चार लाख ८७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यावरील भारतीय स्टेट बँक (मोंढा शाखा) परिसरात हरियाणा राज्याची पासिंग असलेल्या स्विफ्ट गाडीत काही संशयित इसम आले असल्याची टीप पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांना फोनवरून मिळाली.
माहिती मिळताच ताईतवालेंसह हवालदार अविनाश भास्कर, ज्ञानेश्वर मेटे, सागर विघे, लघाने यांचे पथक त्या ठिकाणी दाखल झाले. मात्र पोलिस आल्याची चाहूल लागताच वाहनात (एच.आर.९३ बी. ६५५७) बसलेले सर्वजण स्टेशन रस्त्याने वाहन घेऊन सुसाट घेऊन निघाले. यावेळी पोलिसांनीही शासकीय वाहनासह दुचाकीवरून या वाहनाचा पाठलाग सुरू केला. दरम्यान जरुळ फाट्यावर दरोडेखोर पोहोचले. मात्र या ठिकाणी नागरिकांचा जमाव बघून दरोडेखोर पुन्हा माघारी फिरले व त्यांनी आपली कार वैजापूरच्या दिशेने वळवली. शहरात पोहोचताच त्यांनी जीवनगंगा हाऊसिंग सोसायटीत सुसाट वाहन घुसविले.
वसाहतीच्या शेवट आघूर रस्त्यालगत असलेल्या जेजुरकर वस्तीवर त्यांनी वाहन सोडून पळ काढला. दरम्यान पोलिसांकडून दरोडेखोरांचा सुरू असलेला सिनेस्टाईल पाठलाग परिसरातील नागरिकांनी याची देही, याची डोळा अनुभवला. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, नितीन नलवडे, युवराज पाडळे, नंदकुमार नरोटे, हवालदार कुलदीप नरवडे, अनिल दाभाडे, छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक महेश घुगे, कासम शेख, हवालदार प्रमोद पाटील, सचिन राठोड, बलविरसिंग बहुरे यांच्या पथकाने संशयित दरोडेखोरांचा वैजापूर शहर व परिसरात शोध सुरू केला. तालुक्यातील तिडी शिवारातील जिल्हा परिषद शाळेजवळ दोघेजण संशयितरित्या फिरत असल्याचा सुगावा उशिरा रात्री पोलिसांना लागला.
त्यानंतर पथकाने तिडी, मकरमतपूर शिवारात अंधारात संशयित दरोडेखोरांचा शोध घेतला. यावेळी तिडी गावात जिल्हा परिषद शाळेजवळ दोन इसम संशयितरित्या वावरताना दिसून आले. परंतु पोलिस येत असल्याची चाहूल लागताच त्यांनी तेथूनही पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मोहमंद कैफ नजमोद्दीन व आझाद इमरु खान (रा. झारोकशी या दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य, २२ हजारांची रोकड, कार व चार लाख ८७ हजार ७७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कारवाई दरम्यान अन्य तीन साथीदार पळ काढण्यात यशस्वी झाले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Social Plugin