Hot Posts

6/recent/ticker-posts

Collector's meeting | प्रशासनाचे 'वरातीमागून घोडे'; साडेतीन महिन्यांनंतर सुचली उपरती!

अर्ध्या मे महिन्यात टंचाईचा उहापोह


वैजापूर: मे महिना अर्धा उलटल्यानंतर प्रशासनाला पाणीटंचाई आढावा बैठक घेण्याची उपरती सुचली. भर उन्हाळ्यात पाणीटंचाईबाबत प्रशासनाने तालुकास्तरावर एकही बैठक न घेता अख्खा उन्हाळा पार केला. आता एकूणच पावसाळ्याच्या तोंडावर हे उशिरा सुचलेले शहाणपण तहानलेल्या नागरिकांच्या किती पथ्यावर पडणार आहे? हाच खरा प्रश्न आहे.

येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वच विषयांवर उहापोह करण्यात आला. विशेषतः पाणीटंचाईबाबत साधकबाधक चर्चा करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले. 
यावेळी स्वामी म्हणाले की,
पाणीटंचाईचे संकट दूर करून प्रत्येक गाव टँकर मुक्त करण्यासाठी जलसमृद्ध ग्राम योजना प्रभावीपणे राबवा. तसेच सध्या सुरू असलेल्या टँकरच्या माध्यमातून स्वच्छ पाणी मिळत आहे का? याची खात्री करून त्यात चुकीच्या पद्धतीने किंवा गैरव्यवहार होणार नाही. या दृष्टीने टँकरची अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे तपासणी करावी. पाणीटंचाईमुळे नागरिक अथवा जनावरे पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत. याची दक्षता घेत असताना टँकर मधील पाणी स्वच्छ आहे किंवा नाही? याबाबत आवर्जून तपासणी करावी. 


वैजापूर तालुक्यामध्ये ३७ गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असताना पाणी कोण कुठून भरून घेतो? किती फेऱ्या होतात? टँकर मधील पाण्याच्या वारंवार तपासण्या केल्या जातात का? यासंदर्भात ग्राम महसूल अधिकारी तथा ग्रामसेवकांना गावनिहाय विचारणा करावी व त्या गावात जाऊन संयुक्तरीत्या तपासणी करण्याचे कडक  निर्देश जिल्हाधिकारी दिले आहेत. याशिवाय स्मशानभूमीबाबतही त्यांनी काही सूचना केल्या. 
ग्राम महसूल अधिकारी व ग्रामसेवक यांनी गावागावात जाऊन स्मशानभूमी बाबतच्या समस्या जाणून घ्याव्यात व स्मशानभूमीसाठी जागा नसल्यास त्याबाबत तक्ता बनवून फेरतपासणी करावी. स्मशानभूमीची सातबारा नोंद घ्यावी. रस्ता नसल्यास त्याबाबत प्रस्ताव पाठवावा. अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 
ग्राम महसूल अधिकारी कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांनी सर्व शेतकऱ्यांची ॲग्रिस्टॅक - ई - केवायसी व शेतकऱ्यांची निगडित सर्व लाभाच्या गोष्टी तात्काळ पूर्ण करून घ्याव्यात. रोजगार हमी योजनेतर्गंत जास्तीत - जास्त कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत.असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.
कृषी विभागाने बी - बियाणे व खतांचा पुरेसा पुरवठा करून ठेवावा व शेतकऱ्यांना अडचणी येणार नाहीत. याबाबत उपाययोजना कराव्यात. असे त्यांनी सांगितले. या बैठकीस उपविभागीय अधिकारी डाॅ. अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत, उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, रामेश्वर महाजन, उपविभागीय अभियंता रोडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आता साध्य काय होणार?

दरम्यान उन्हाळ्याचे मुख्य साडेतीन महिने संपून गेल्यानंतर प्रशासनाला पाणीटंचाई आणि रोहयोच्या कामांची उपरती सुचत असेल तर काय म्हणावे? असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. पावसाळा तोंडावर आला म्हटल्यापेक्षा सुरू झाला. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भलेही तो बेमौसमी पाऊस असो. गेल्या आठ दिवसांपासून अवकाळीच्या पावसाने कहर केला आहे. अशा परिस्थितीत प्रशासन आढावा बैठकीत पाणीटंचाईवर चर्चा करून काही साध्य करीत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.