Hot Posts

6/recent/ticker-posts

Samruddhi Highway Accident | कारने धडक दिली अन् दोघे.; 'त्या' चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले!

समृद्धी महामार्गावरील दुर्देवी घटना 


वैजापूर: भरधाव जाणाऱ्या कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात  दोन ठार तर चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना १३ मे रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावरील डवाळा शिवारात घडली. जखमींमध्ये तीन लहान मुलींचा समावेश असून त्यांच्या आईचा या घटनेत मृत्यू झाला आहे. 


पुनम अजयसिंग चव्हाण ( २८ रा. सराया, जोनपूर, उत्तर प्रदेश) व देवानंद मुशींलाल चव्हाण (२१ रा. पाथर्डी ता.जि.नाशिक) अशी घटनेतील मृतांची नावे आहे तर अजयसिंग चव्हाण (३८), नॅन्सी चव्हाण (८ वर्षे), अनन्या चव्हाण (५ वर्षे) व पियान्सी चव्हाण (८ महिने) सर्व रा.जोनपूर, उत्तर प्रदेश ह.मु. गोवा) अशी जखमींची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयसिंह चव्हाण हे  पत्नी, तीन मुली व  चुलतभाऊ देवानंद चव्हाण यांच्यासह समृद्धी महामार्गावरून कारने (क्रमांक जी.ए. ०७ पी. ३१२२) नाशिकहून उत्तरप्रदेश येथील येथे त्यांच्या मूळगावी जात होते. दरम्यान वैजापूर तालुक्यातील डवाळा शिवारात पोहोचल्यानंतर त्यांच्या कारने अज्ञात वाहनाला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत अजयसिंह यांच्यासह वाहनातील सर्वचजण गंभीर जखमी झाले. अपघातातील जखमींना रुग्णवाहिकेतून शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुनम चव्हाण यांना तपासून मृत घोषित केले तर देवानंद चव्हाण याला गंभीर अवस्थेत पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अन्य जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

त्या चिमुकल्या आईच्या मायेला मुकल्या 

घटनेतील मयत पुनम चव्हाण यांना तीन मुली आहेत. एका मुलीचे वय आठ वर्षे, दुसरीचे पाच तर तिसऱ्या मुलीचे वय आठ महिन्यांचे असून या घटनेत पुनम यांचा मृत्यू झाल्याने या तिन्हीही मुली लहान वयातच आईच्या मायेला मुकल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.