आमदारांसह ठेवीदारांची पोलिस ठाण्यात धाव
वैजापूर : पतसंस्थेकडून ठेवीदारांना गंडा घालण्याचे काम सुरूच असून आता पुन्हा ठेवीवर जास्तीचे व्याज देण्याचे आमिष दाखवून ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालणाऱ्या शहरातील आणखी एका पतसंस्थेचे बिंग फुटले. दरम्यान शहरातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून फसवणूक झाल्याचे समजताच सोमवारी ठेवीदारांनी शिंदेसेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस ठाणे गाठून आपली कैफियत मांडली. ठेवीदारांच्या लेखी तक्रारी व पुराव्यानंतर रितसर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
शहरातील येवला रस्त्यावरील ज्ञानराधा मल्टिस्टेट को- आॅपरेटिव्ह संस्थेने ठेवींवर व्याज देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण ताजेच असताना आता येथील शहरातील म्हसोबा चौकातील साईबाबा महिला नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेत ठेवीदारांना कोट्यवधी रुपये ठेवले होते. परंतु या पतसंस्थेला अचानक टाळे लागल्याने ठेवीदारांच्या तोंडचे पाणी पळाले. पतसंस्थेच्या दरवाजाला टाळे लागल्याने आज उघडेल, उद्या उघडेल. या अपेक्षेने ठेवीदार पतसंस्थेचे उमरे झिजवत होते. परंतु टाळे उघडलेच नसल्याने आपण ठगले गेलो. याची खात्री ठेवीदारांना झाली अन् मग त्यांनी शिंदेसेनेचे आमदार तथा मुख्य प्रतोद रमेश बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन त्यांना आपबिती सांगितली.
दरम्यान मागील काही दिवसांपासून बँकेत काही तरी आर्थिक 'झोल' झाल्याचे पतसंस्थेच्या ठेवीदारांना भणक लागली. त्यामुळे सहा ते सात दिवसांपासून ठेवीदार पतसंस्थेच्या वैजापूर शाखेत चकरा मारत होते. परंतु सलग चकरा मारून ही शाखा बंद होती. त्यामुळे ग्राहकांनी बॅंकेचे चेअरमन व संचालकांशी संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर ठेवीदारांचा बांध सुटला व त्यानंतर आमदार रमेश बोरनारे, उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांच्या समवेत जवळपास ६० ठेवीदारांनी पोलिस ठाणे गाठले.
पतसंस्थेतील संबंधितांवर गुन्हे दाखल करुन त्यांच्याकडून ठेवीदारांची रक्कम वसूल करण्याची मागणी आमदार बोरनारे यांनी यावेळी केली. आर्थिक फसवणूक झालेल्या ग्राहकांची एकूण किती कोटींची फसवणूक झाली? हा आकडा समोर आला नसला तरी कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा असल्याचे समजते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून ठेवीदारांच्या तक्रारी व पुरावे बघून संबंधित पतसंस्थेच्या संचालकांसह कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी सांगितले .
नवनवीन पतसंस्था येताहेत उदयास
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच शहरातील ज्ञानराधा मल्टीस्टेट को- आॅपरेटिव्ह पतसंस्थेच्या फसवणुकीचे प्रकरण ताजे असतानाच शहरावासीयांना हा दुसरा 'झटका' बसला आहे. ठेवीदारांना किती रुपयांना गंडविले? हा आकडा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरच समोर येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात नवनवीन पतसंस्था उदयास येत आहे. ठेवीदारांना आमिष दाखवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेऊन या पतसंस्था गाशा गुंडाळतात. असे असतानाही ठेवीदार नवनवीन पतसंस्थेत अर्थिक गुंतवणूक करतात. हे विशेष! त्यामुळे ठेवीदारांनीही तेवढीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. खबरदारी घेतल्यास अशा महाठक पतसंस्थाकडून फसवणूक होणार नाही.
Social Plugin