Hot Posts

6/recent/ticker-posts

Manoj Kumar funeral | योगदान: मनोजकुमारांच्या अंत्यविधीसाठी शिर्डीतून शाल, हार, चंदनाचे लाकूड; साईगाथेला केले अजरामर

 शिर्डीकरांशी होते जिव्हाळ्याचे संबंध


शिर्डी: ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार (Actor Manoj Kumar) यांच्या देशभक्तीपर चित्रपटाचे योगदान पाहता ती तुलना अन्य कोणत्याही चित्रपटांशी होऊ शकत नाही. मनोजकुमार केवळ अभिनेते, दिग्दर्शक नव्हते तर ते एक 'युग' होते. त्यांच्या निधनामुळे या युगाचा अस्त झाला आहे. परंतु असे असले तरी वैविध्यपूर्ण व आशयघन चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी आणि ते चिरकाल स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने शिर्डीवर (Shirdi) शोककळा पसरली. शिर्डी साई संस्थानच्या वतीने (Shirdi Sai sansthan) मनोजकुमार यांच्या पार्थिवावर साईबाबांची शाल, फुलांचा हार व चंदनाचे लाकूड पाठविण्यात आले. 


शिर्डीच्या विकासात मोलाचे देणारे, साईबाबांच्या जीवनगाथेला saibaba jivangatha) रुपेरी पडद्यावर अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते मनोजकुमार गोस्वामी यांचे निधन झाले. सन १९५६ च्या आसपास मनोजकुमार प्रथम शिर्डीला आले व पहिल्याच भेटीत साई व शिर्डीशी त्यांचे अतूट नाते निर्माण झाले. त्यांनी त्यावेळी बोटात साईची चांदीची अंगठी घातली होती. त्यानंतर त्याच अंगठीत वेळोवेळी चांदीची भर टाकून ती अंगठी आजवर सतत वापरली, असे येथील जाणकार सांगतात. 

वारंवार शिर्डीला येणाऱ्या मनोजकुमार यांनी १९७७ मध्ये 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट मनोजकुमार यांनी सत्यसाईबाबांच्या सूचनेवरून काढल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटातून त्यांनी श्रद्धेबरोबरच सर्वधर्म समभाताचा संदेश दिला. २० मे, १९७६ ला या चित्रपटाच्या प्रत्यक्ष चित्रीकरणास सुरुवात झाली व फेब्रुवारी १९७७ मध्ये हे चित्रीकरण पूर्ण झाले.

 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच्या पहिल्याच दिवाळीत १३ नोव्हेंबर १९७७ रोजी शिर्डीत भाविकांच्या गर्दीने केलेला उच्चांक आजही कायम आहे. या चित्रपटाने भाविकांचा ओघ वाढला व शिर्डीच्या अर्थकारणाला ऊर्जा मिळाली. शिर्डी खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर आले. साईबाबांवर दहा चित्रपट आणि दोन दूरचित्रवाणी मालिका प्रसिद्ध झाल्या. परंतु मनोजकुमार यांचा चित्रपट अव्वल राहिला.

उरल्या फक्त आठवणी

१९८३ मध्ये शिर्डीतील त्यावेळी सर्वात मोठे असलेल्या 'साईबाबा इंटरनॅशनल' या हॉटेलचे भूमिपूजन अभिनेते राजकपूर यांच्या हस्ते झाले तर उद्घाटन मनोजकुमार यांच्या हस्ते होते. मात्र आजही हे हॉटेल मनोजकुमार यांचेच म्हणून ओळखले जाते. साईंच्या रूग्णसेवेचा वसा समृद्धपणे चालवणाऱ्या साईनाथ रूग्णालयात मनोजकुमार यांच्या देणगीतून १९९३ च्या सुमारास आयसीयू युनिट बसवण्यात आले. शिर्डीसारख्या ग्रामीण भागात ही सुविधा प्रथमच उपलब्ध झाली.

रथातून काढली मिरवणूक 

४ जानेवारी २००० रोजी साईसमर्थ पतसंस्थेचे उ‌द्घाटन मनोजकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांची रथातून शहरात वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली व 'साईरत्न' पुरस्काराने गौरवण्यात आले.

रस्त्याला नाव 

शिर्डीतील मनोजकुमार यांच्या कार्याची, साईच्या प्रचार प्रसाराची दखल घेत संस्थानचे तत्कालीन अध्यक्ष जयंत ससाणे व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातून १५ मे २००६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते पिंपळवाडी रोडचे 'मनोजकुमार पथ' असे नामकरण करण्यात आले.

सर्वधर्मसमभावाचा संदेश 

१९७७ मध्ये 'शिर्डी के साईबाबा' चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट मनोजकुमार यांनी सत्यसाईबाबांच्या सूचनेवरून काढल्याचे सांगण्यात येते. या चित्रपटातून त्यांनी श्रद्धेबरोबरच सर्वधर्म समभावाचा संदेश दिला

.