Hot Posts

6/recent/ticker-posts

Chief Officer | 'सीओं'ना कुणीतरी 'आवरा' हो.! जिल्हाधिकाऱ्यांची पुन्हा नोटीस; दोन माजी नगराध्यक्षही 'मैदानात'

'देवाणघेवाणी'साठी पती असतो सोबत 


वैजापूर:  लोकप्रतिनिधींमुळे किमान लोकांचा आवाज ऐकला जायचा, पण प्रशासकराजमुळे लोकांचा आवाज दाबला जात असून समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना उद्धट वर्तणूक, मनमानी कारभार, कामाच्या संचिका टक्केवारीसाठी दाबून ठेवणे आणि सर्वसामान्य जनतेची आर्थिक पिळवणूक करणे, कर्मचाऱ्यांना विविध कारणांवरून नोटीस बजावून त्यांना जाच करण्याचा 'विडा' पालिका अधिकाऱ्यांनी उचलला आहे. याबाबत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मुख्याधिकाऱ्यांची तक्रारी केल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने खुलासा सादर करण्याची नोटीस मुख्याधिकाऱ्यांना बजावल्याने खळबळ उडाली आहे.

 गैरव्यवहाराची चौकशी करा.!

मुख्याधिकारी संगीता नांदूरकर नगर परिषदेत आल्यापासून शहराची आर्थिक लूट सुरू केली आहे. प्रत्येक कामात दलालामार्फत पैशांची मागणी केली जाते. प्रत्येक ठरावासाठी दहा हजार रुपयांची मागणी केली जाते. त्याचप्रमाणे रिंग करून ऑनलाईन निविदा मॅनेज करण्यासाठी पैसे घेतले जातात. कार्यारंभ आदेशासाठी अंदाजपत्रकच्या १ टक्के पैशाची मागणी केली जाते. त्यांनतर काम सुरू झाल्यानंतर गुत्तेदाराकडून १५ टक्के व पुरवठादाराकडून ५० टक्के पैशांची मागणी केली जाते व पैसे मिळल्यानंतर संबंधिताचे बिल दिले जाते. तसेच पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी पतीला बरोबर येऊन येतात, त्यामुळे मुख्याधिकारी नांदूरकरांची लाचलुचपत विभागामार्फत चौकशी करावी व त्यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करावी, अशी तक्रार शिवसेेनेचे  माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी केली होती. नागरिक दूरच, राजकीय व्यक्तींचेही प्रशासन ऐकत नाही. अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची मोठी किंमत शहराला चुकवावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला आलेला हा मुजोरपण मोडून काढण्यासाठी पालिकेच्या काही माजी नगराध्यक्ष व नगर सेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडेच मुख्याधिकाऱ्यांच्या गैरकारभाराला आवरा. अशी तक्रार केली होती.

महिनोन्महिने होत नाही सह्या!

नागरिकांचे कामे, विविध प्रमाणपत्र त्याच प्रमाणे नामांतर, बांधकाम परवानगी व इतर प्रमाणपत्रे व नकला देण्यासाठी अर्जदारांकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित विभागप्रमुख कार्यवाही पूर्ण करून मुख्याधिकारी याच्या स्वाक्षरीसाठी संचिका ठेवतात. परंतु या संचिकांवर महिनोन्महिने सह्या होत नाहीत. जेव्हा अर्जदार काम झाल्याबाबत कार्यालयात विचारणा करतात तेव्हा सह्या झालेल्या नसतात व अर्जदारास दलालामार्फत मुख्याधिकारी पैशाची मागणी करतात व जे लोक पैसे देतात त्याचेच काम केले जाते, असा तुघलकी कारभार सुरू असल्याची तक्रार माजी नगराध्यक्ष राजूसिंह राजपूत यांनी केली होती.

माजी नगरसेविकांची तक्रार

 संगीता गायकवाड व द्वारकाबाई घाटे या दोन माजी नगरसेविकांनीही जिल्हधिकाऱ्यांकडे मुख्याधिकारी यांच्या गैरकारभाराविषयी लेखी तक्रार करून नांदूरकर यांची तातडीने चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, वैजापूर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच असे वादग्रस्त अधिकारी शहराला लाभल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

'सत्यार्थी'च्या बातमीची दखल 

दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी नांदूरकरांना नोटीस बजावून वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्यांच्या कात्रणांसह तक्रारींच्या अनुषंगाने स्वयंस्पष्ट खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये 'सत्यार्थी'सह विविध वर्तमानपत्रांच्या बातम्या आहेत.