नांदगावजवळील भीषण दुर्घटना
वैजापूर: कंदुरीचा कार्यक्रम आटोपून घरी परतत असताना कारचा भीषण अपघात होऊन दोघेजण जागीच ठार झाल्याची दुर्घटना ४ एप्रिल रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहरापासून साधारणतः सात किलोमीटर अंतरावर असलेल्या येवला रस्त्यावरील नांदगावजवळ घडली.
राहुल राजाराम जगताप (वय २८) व दर्शन पांडुरंग जगताप (वय १६) दोघे रा. भग्गाव ता. वैजापूर) अशी या अपघातातील मृतांची नावे असून ते दोघे सख्खे चुलत भाऊ होते. तसेच ते आईवडीलांना एकुलते एक असल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त कार काही फुट उंच हवेत उडून रस्त्याच्या खाली गेल्याने गाडीचे इंजिन व पुढील चाके निखळून रस्त्याच्या खाली जाऊन उलटली होती. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागिय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मयत राहुल जगताप हा काही महिन्यांपूर्वीच कृषी खात्यात कृषी सहायक म्हणून रुजू झाला होता. येवला तालुक्यातील भारम-कोळम येथील यात्रेनिमित्त आत्याच्या घरी ठेवण्यात आलेल्या कंदुरीच्या कार्यक्रमासाठी हे दोघे सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भारमला पोहोचले.
तेथील कार्यक्रम आटोपून पावणेचारच्या सुमारास घरी परतत असतांना वैजापूरपासून सात किमी अंतरावर असलेल्या नांदगावजवळ एका हॉटेलसमोर कारने (एम एच २० सीएस १२६०) रस्त्याच्या कडेला असलेल्या विद्युत खांबाला धडक दिल्याने ती हवेत उडून ठिणग्या उडाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
त्यानंतर ही कार प्रचंड वेगाने रस्त्याच्या खाली गेल्याने कारची चाके निखळून पडले तर इंजिनसह बहुतांश भाग वेगवेगळे झाले व कारमधील दोघांचाही करुण अंत झाला. दोघांचेही येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मयत राहुल याचे वडील मेजर राजाराम जगताप हे येथील उपविभागिय पोलिस अधिकारी कार्यालयात चालक पदावर कार्यरत आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
Social Plugin