वैजापुरात पोलिस अधिकाऱ्यांची भेट
वैजापूर: पूर्व वैमनस्यातून तुंबळ हाणामारी होऊन एकाचा चाकूने भोसकून खून तर अन्य तीनजण गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तालुक्यातील खंडाळा येथे घडली होती. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या सर्वांना बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान पोलिसांनी सात जणांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
मोईन मुख्तार शाह (२३) असे या घटनेत ठार झालेल्याचे नाव आहे तर अबरार आरिफ शेख (२४), शोएब आरिफ पठाण (२३) व अबू बकर आरिफ शेख (२२ ) सर्व रा. खंडाळा अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.
गौरव राजू अनर्थे (रा. नायगाव), अक्षय सुरेश पवार, शेखर लक्ष्मण नन्नावरे व नंदू पोपट जानराव, शुभम कैलास जाधव, अमित रमेश पवार व कुणाल प्रभाकर जेजुरकर (सर्व रा. खंडाळा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खंडाळा गावातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एका हाॅटेलसमोर भांडण होऊन त्याचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले. या झटापटीत गौरव अनर्थे याने मोईन शाह याला चाकूने भोसल्याने तो ठार झाला व तर अन्य तिघेजण जखमी झाले आहे.
घटनेनंतर सर्वांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर डाॅक्टरांनी मोईन याला तपासून मृत घोषित केले तर अबरार शेख व शोएब पठाण या दोघांवर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. रुग्णालयात मोठी गर्दी झाल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांना पाचारण करण्यात आले.
दरम्यान ही घटना नेमक्या कोणत्या कारणाने झाली? याबाबत स्पष्ट खुलासा होऊ शकला नसला तरी जुन्या वादातून ही घटना झाल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले करीत आहेत.
दरम्यान पोलिसांनी या सात जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विशेष पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक विनयकुमार राठोड, माजी खासदार इम्तियाज जलील यांनी वैजापूर येथे भेट दिली.
Social Plugin