Hot Posts

6/recent/ticker-posts

Ladki Bahin Yojana | 'बहिणीं'ना अनुदान मिळाले, 'ताईंना' भत्ता कधी? राज्यकर्त्यांनी सोडले वाऱ्यावर

सात महिने उलटूनही पदरी निराशाच 


वैजापूर: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वच बाबींवर धडाकेबाज निर्णय होत असताना दुसरीकडे अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहिणींचे भरलेल्या अर्जांपोटी प्रोत्साहन भत्ता अजूनही मिळायला तयार नाही. लाडक्या बहिणींना पाठोपाठ हफ्ते सुरू असताना अंगणवाडी ताईंना मात्र मोबदल्याची प्रतीक्षा करावी लागत आहे.


विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाॅंचिग केले. परंतु दरम्यानच्या काळात लाडक्या बहिणींना अनुदानासाठी 'तारीख पे तारीख' दिली जात होती. ज्या लाडक्या बहिणींचे अर्ज आॅनलाईन भरून सबमिट केले त्या अंगणवाडी सेविकांनाही रक्कम देण्यापासून वंचित ठेवले आहे. विधानसभा निवडणूक झाल्यानंतर शासनाने नवीन नियम लागू करून बहुतांश लाडक्या बहिणींना कात्री लावण्यात आल्या. त्यामुळे शासनाच्या निकषांत ज्या बहिणी पात्र आहेत. अशानांच आता हे अनुदान मिळणार आहे. 

लाडकी बहीण योजनेची जूलै २०२४ मध्ये घोषणा झाली. दरम्यान तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या ८४ हजार लाडक्या बहिणी आहेत. योजना सुरू होऊन जवळपास ७ महिने झाले. एकीकडे बहिणींचे अनुदानाचे हफ्ते नियमित सुरू असताना दुसरीकडे अंगणवाडी सेविकांना हक्काच्या प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित ठेवले जात आहे. प्रती अर्जांपोटी ५० रुपये मोबदला देण्याचे शासनाने जाहीर केले होते. परंतु शासनाला हा प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी अजूनही मुहूर्त सापडेना.

 सेविकांनी आपला वेळ खर्ची घालून अपेक्षेपोटी अर्ज आॅनलाईन भरून सबमिट केले. परंतु त्यांच्या या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. लाडक्या बहिण योजनेचे निकष बदलून ही योजना गठित करण्यात आली. परंतु सेविकांना अजूनही मोबदला मिळायला तयार नाही. राज्यकर्त्यांनी त्यांना वाऱ्यावर सोडल्यामुळे अशा परिस्थितीत सेविकांनी दाद कुणाकडे मागायची? हाच खरा प्रश्न आहे. 

लाडक्या बहिणींचेही परवडेच!

शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरू केली खरी. परंतु विधानसभा निवडणुकीनंतर शासनाने बहिणींचे परवडे सुरू केले आहे. दरम्यान काळात अनुदान लांबणीवर पडल्याने बोंबाबोंब सुरू झाली. नंतर अनुदान पडायला लागले. परंतु त्यातही कात्री लावायला सुरुवात झाली. काही महिलांना एकच हफ्ता तर काहींना हफ्त्याची अर्धवट रक्कम पदरात पडल्याचे प्रकार दिसून आले. त्यामुळे दिवसेंदिवस या योजनेबाबत भ्रमनिरास होऊ लागला आहे.

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मुहूर्त लागेना 

प्राप्त माहितीनुसार, अंगणवाडी सेविकांनी केलेल्या कामाची रक्कम जिल्हास्तरावर येऊन पडलेली आहे. साधारणतः आठ ते दहा दिवसांपूर्वी रक्कम जमा होऊनही ती अजूनही सेविकांना वितरित करण्यात आली नाही. प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी अगोदरच विलंब झालेला असतानाच दुसरीकडे जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना हा निधी वितरित करण्यासाठी मुहूर्त लागेना. 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' या उक्तीप्रमाणे या निधीची गत झाली आहे. तालुक्यातील जवळपास १५० पेक्षा अधिक सेविकांना या प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा आहे.

लाडकी बहिण योजना सुरू होऊन सात महिने उलटूनही अंगणवाडी सेविकांना केलेल्या कामांचा मोबदला मिळायला तयार नाही. लाडक्या बहिणींना नियमित अनुदान सुरू असताना सेविकांवर हा अन्याय कशासाठी? यासंदर्भात आम्ही लवकरच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची भेट घेऊन आमची कैफियत मांडणार आहोत.

- माया म्हस्के, जिल्हाध्यक्ष, शिक्षक भारती संघटना, वैजापूर