महिलांना २१०० रुपये मिळणार नाहीच
मुंबई: विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महत्त्वाकांक्षी आणि लक्षवेधी ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी (Mukhyamantri Mazhi Ladki Bahin Yojana) अर्थमंत्री अजित पवारांनी (Finance Minister Ajit Pawar) अर्थसंकल्पात ३६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतर्गत सुमारे २ कोटी ५३ लाख लाभार्थी महिलांना जुलै २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी ३३ हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला. २०२५-२६ मध्ये या योजनेकरिता एकूण ३६ हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन आहे. या योजनेतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यात सुरूवातीला १,५०० रुपये हप्ता जमा करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या आधी लाडक्या बहिणींना २१०० रुपये देऊ असे म्हटले होते. मात्र लाडकी बहीण योजनेसाठी गेल्यावर्षी जी तरतूद करण्यात आली, तेवढ्याच रकमेची तरतूद २०२५-२६ वर्षासाठी करण्यात आली आहे.
'लखपती दीदी' करणार
अजित पवार म्हणाले की, दीनदयाल अंत्योदय योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे २२ लाख महिलांना 'लखपती दीदी' करण्यात आले आहे. आता पुढील आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत २४ लाख महिलांना लखपती बनवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
लेक लाडकीचा १ लाख १३ हजार लाभार्थींना लाभ
लेक लाडकी योजनेंतर्गत १ लाख १३ हजार लाभार्थ्यांना थेट लाभ देण्यात आला आहे. २०२५-२६ साठी या योजनेसाठी ५०.५५ लाख रुपयांच्या निधी प्रस्तावित आहे. मुलींच्या व्यवसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या १०० टक्के प्रतीपूर्तीसाठी करण्यात येत असल्याचे अर्थमंत्री म्हणाले.
Social Plugin