चोरी करताना पकडले रंगेहाथ
चोपडा: जालना येथील फौजदारच चोरांच्या टोळीचा सरदार निघाल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. सेवानिवृत्तीला अवघे काही महिने शिल्लक असताना फौजदार टाेळीसह बसस्थानकामध्ये जाऊन चाेरी करायचा अन् साळसूद असायचा. बुधवारी चाेपडा (जि. जळगाव ) बसस्थानकात चाेरी करून परतत असताना जळगाव पाेलिसांनी त्याला पाठलाग करून रंगेहाथ पकडले. गेल्या अनेक दिवसांपासून पाळत ठेवत पाेलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या असून त्याने पोलिसांना चाेरीची कबुली दिली आहे.
फौजदार प्रल्हाद पिराेजी मांटे (५७) याच्यासह चार चाेरांना पाेलिसांनी पकडले आहे. १६ एप्रिल राेजी चाेपडा बसस्थानकावर दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वाळकी (ता. चोपडा) येथील शेतकरी वसंत उखा कोळी (७६) यांच्याकडील ३५ हजार रुपयांची राेख रक्कम चाेरी झाली. या घटनेतून पैसे उकळणारी एक सक्रिय टोळी असल्याचे पोलिसांनी सांगितले असून स्थानिक गुन्हे शाखेने व चोपडा शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून एकूण चार आरोपींना पकडले. त्यांच्याकडून इंडिका कार (एमएच-४३ एन-२९२८ व)व रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
चोपडा बसस्थानक व गावात छोट्यामोठ्या चोऱ्या,आणि बसस्थानकात महिलांचे सोने चोरल्याची घटना सतत घडत हाेत्या. यात चोपडा पोलिस व जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने पाळत ठेवून बुधवारी कारवाई केली. फौजदार प्रल्हाद पिराजी मान्टे (रा. सदरबाजार, जालना) श्रीकांत भीमराव बघे (२७, रा. गोपालनगर खामगाव), अंबादास सुखदेव साळगावकर (४३ रा. माना ता.मूर्तिजापूर जि. अकोला,) रऊफ अहमद शेख (४८, रा. महाळसता. जि. बीड) यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी व स्थानिक चोपडा शहर पोलिसांनी चोपडा-धरणगाव रस्त्यावरपाठलाग करून पकडले. यातील अंबादास साळगावकर या आराेपीवर महाराष्ट्रभरात तब्बल२७ गुन्हे दाखल आहेत. दरम्यान फौजदारच चोरांच्या टोळीचा सरदार निघाल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
निरीक्षण करून आखली क्लृप्ती
महाराष्ट्रात बसस्थानकांवर झालेल्या अनेक चोऱ्यांमध्ये त्याचा हात असल्याचा संशय असून बसस्थानकावरच काम केल्याने त्याने प्रवाशांचे निरीक्षण करून काही चोरीच्या युक्त्या तयार केल्या. त्याने राज्यातील अनेक चोरांना प्रशिक्षणही दिले. दरम्यान, सेवानिवृत्तीला अवघे तीन महिने बाकी असताना चोपडा बसस्थानकावर चोरी करण्यासाठी आला होता. त्याने चोरी केल्याचीही कबुली दिली आहे.केल्याची कबुली दिली. त्याच्यासोबत चार सराईत चोरांना अटक करण्यात आली आहे.
चोरांना देत होता प्रशिक्षण
पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे हा राज्यभरातील बसस्थानकावर चोरीचे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय आहे. पकडले जावू नये म्हणून तो कधीही हॉटेल किंवा लॉजवर थांबत नव्हता. कारमधून स्वयंपाक बनवण्याचे साहित्य, अंथरूण-पांघरून ताब्यात घेण्यात आले आहे. बसस्थानकांवरील चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हातखंडा असल्याने तो अनेक चोरांना प्रशिक्षण देखील देत असल्याची माहिती पुढे आली आहे.
Social Plugin