कंपनीचे देयक काढण्याचा होता प्लॅन
वैजापूर: नगरपालिकेच्या नुकतीच बदली झालेल्या अधिकारी व एका कर्मचाऱ्याचे व्हाॅट्सॲप चॅट लिकेज् झाले असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जाता - जाता एका कंपनीचे देयक काढून त्यापोटी मोठा 'मलिदा' हडपण्याचा डाव सतर्कतेमुळे उधळला गेला. अधिकारी बदलून गेले पण 'तो' कर्मचारी मात्र ऐन तोफेच्या तोंडी सापडला असून त्याचीही लेखा विभागातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.
त्याचे झाले असे की, गेल्या दिवसांत वैजापूर नगरपालिकेत नाट्यमय घडामोडी घडल्या. तत्कालीन मुख्याधिकाधिकाऱ्याची तडकाफडकी झालेली बदली अन् त्याच दिमाखात आणि शानदार एंट्रीत नवे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी स्वीकारलेला पदभार हा खुमासदार चर्चेचा विषय ठरला आहे. तत्कालीन अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर शहरात 'दिवाळी' साजरी करून जल्लोष करण्यात आला.
परंतु हा विषय इथेच संपला नाही तर या नाट्यमय घडामोडींनंतरही पालिकेच्या एक-एक सुरस कथा बाहेर येत आहे. २४ जून रोजी बदली आदेश आल्यानंतर पालिकेच्या एका अधिकाऱ्यासह लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याने मोठा प्लान रचला; परंतु कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला अन् ते तोंडघशी पडले. या दोघांच्या व्हाॅट्सॲप चॅटमधून या बाबीचे बिंग फुटले आहे.
लेखा विभागातील सु(चांगला) भाष(बोलणारा) कर्मचाऱ्याने 'मधुरवाणीतून' हा अधिकाऱ्याशी संवाद साधला. जळगाव येथील महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी शहरासाठी तुरटीसह ब्लिचिंग पावडर पुरवते. प्राप्त माहितीनुसार यापोटी कंपनीचे पालिकेकडे जवळपास तीन लाख रुपये देयक आहे. हे देयक काढून देण्यासंदर्भात या दोहोंत व्हाॅट्सॲपवर हा संवाद झालेला आहे.
परंतु ज्या दिवशी बदलीची भणक सायंकाळच्या सुमारास पालिकेतील कर्मचाऱ्यांना लागली अन् त्यांनी त्या अधिकाऱ्याचा बगलबच्च्याला खबर लागू न देता लेखा विभागाला टाळे ठोकले. त्यामुळे कंपनीचे धनादेशाद्वारे काढण्यात येणाऱ्या देयकाचा प्लॅन उधळला गेला.
कसे फुटले बिंग?
लेखा विभागातील 'त्या' कर्मचाऱ्याचे व्हाॅट्सॲप पीसीला कनेक्ट केलेले होते. बदली आदेश प्राप्त होताच दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने लेखा विभागाला कुलूप ठोकले. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २५ जून रोजी या विभागात जाऊन पीसी चालू केल्यानंतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यातील व्हाॅट्सॲप चॅट समोर आले अन् मोठा बाॅंब फुटला. विशेष म्हणजे याच दिवशी सकाळपासून ते दुपारपर्यंत तो 'मर्जीतील' कर्मचारी देयक काढण्यासाठी प्रयत्नशील होता. परंतु दुपारी भागवत बिघोतांची जल्लोषात एंट्री झाली अन् या अधिकारी आणि कर्मचाऱ्याची आशा मावळली.
काय झाला संवाद?
तो 'पाळलेला' कर्मचारी पालिकेत भल्या सकाळी येतो अन् लेखा विभागाला ठोकलेलेल्या टाळ्यासह सेल्फी (टाळा वुईथ सेल्फी) समोरच्या अधिकाऱ्याला सकाळी ६.१२ वाजता टाकतो. तत्पूर्वी 'महालक्ष्मी'चे होऊ शकते. असा संवाद त्यांच्यात झालेला असतो. त्यानंतर अधिकाऱ्याचे 'शो करू नका, रिझल्ट पाहिजे. पाटीलशी बोलून घ्या आणि तयार संचिका लगेचच घेऊन येऊ शकता का'? असे उत्तर ६.२६ वाजता येते. विशेष म्हणजे बदलीनंतर न. प. कर्मचाऱ्यांनी फटाके वाजवून जल्लोष केल्याची 'वर्दी'ही 'मिठाला' जागलेल्या कर्मचाऱ्याने या चॅटमधून दिली. महालक्ष्मीचे देयक काढून पदरात 'लक्ष्मी' पाडून घ्यायची होती. परंतु 'फियास्को' झाला. दरम्यान अधिकारी - कर्मचाऱ्यात व्हाॅट्सॲपवर झालेल्या चॅटची पालिकेत तर चर्चा झालीच. परंतु ही चर्चा आता शहरातही खुलेआम होऊ लागली आहे.
प्रकरण चौकशीच्या फेऱ्यात
दरम्यान या दोघांचेही व्हाॅट्सॲप चॅट हाती लागल्यानंतर पालिकेत मोठी खांदेपालट करण्यात आली असून 'त्या' कर्मचाऱ्यांसह आणखी काही बगलबच्च्यांची अन्य विभागात रवानगी करण्यात आली आहे. व्हाॅट्सॲप चॅटमधून समोर आलेला 'पाटील' कोण? याचा या प्रकरणाशी काय संबंध? अजून काही घोटाळे आहे का? या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी पालिकेतील एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली असून लवकरच या सर्व प्रकरणांचे बिंग फुटेल. असा विश्वास पालिकेतील विश्वसनीय सूत्रांनी व्यक्त केला आहे.
#Vaijapur municipal council #Cheif officer #Municipal council Employee
Social Plugin