Hot Posts

6/recent/ticker-posts

Chief Officer | वैजापूरच्या मुख्याधिकारी अडचणीत; जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा..; काय आहे प्रकरण?

तिसऱ्यांदा बजावली नोटीस 


वैजापूर: नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर (Sangeeta Nandurkar) यांना जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यापूर्वीही दोनवेळा नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे नांदूरकर चांगल्याच अडचणीत आल्या आहेत.


जिल्हाधिकाऱ्यांनी बजाविलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, वैजापूर शहर स्वच्छतेचा प्रस्ताव एका महिन्यापासून प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात  प्रलंबित असल्याबाबत एका वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती. परंतु सदरील परिपूर्ण प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त नसल्याने या कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तसेच सदर प्रकरणी आपण सादर केलेल्या स्वच्छतेच्या प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता करण्यासाठी व आवश्यक कागदपत्रे / प्रमाणपत्रे पाणीपुरवठा अभियंता एस.पी. चिमटे यांना समक्ष तसेच भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून या कार्यालयास सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. परंतु अद्यापपर्यंत आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नसल्याने प्रस्तावाबाबत पुढील योग्य ती कार्यवाही करता आली नाही. 

वैजापूर शहर स्वच्छतेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित असल्याबाबत एका  वृत्तपत्रात आपणामार्फत माहिती दिल्याचे बातमीमध्ये नमूद आहे. सदर कृतीमुळे या कार्यालयाची तसेच शासनाची प्रतिमा मलिन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

 सदरबाबत गैरशिस्त व बेजबाबदारपणामुळे आपल्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कार्यवाही का प्रस्तावित करण्यात येवू नये? याबाबत ३ दिवसांत खुलासा सादर करावा. खुलासा सादर न केल्यास, तसेच असमर्थनीय असल्यास आपल्याविरुद्ध नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल. असे नमूद करण्यात आले आहे.

वरिष्ठ पातळीवरही तक्रारी 

पालिकेच्या मुख्याधिकाऱ्याचा कारभार गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त ठरला आहे. अभ्यागतांशी तिरसटपणे बोलणे, समस्या न सोडणे, माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेविकांची नाराजी ओढवून घेणे, समस्यांना प्राधान्य न देणे आदी कारणांमुळे त्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ पातळीवर तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीही दोनवेळा नोटीस बजावली असून आता तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.