Hot Posts

6/recent/ticker-posts

Inefficient system | वैजापूर शहर अन् ढिसाळ कुचकामी यंत्रणा! बॅंकांची सुरक्षा वाऱ्यावर; अग्निशमन वाहनही बेभरवशाचे

पोलिसांची गस्त कुठे आहे? 

 

Maharashtra Gramin Bank Vaijapur: वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेला (Bank fire in Vaijapur)चोरीच्या प्रयत्नात आग लागून संपूर्ण बॅंक जळून खाक झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे बॅंकांच्या कुचकामी सुरक्षा यंत्रणेसह अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांच्या कारभाराचे वाभाडे निघाले आहे. चोरट्यांच्या यंत्रणेसमोर सरकारी यंत्रणा नेहमीच कुचकामी ठरतात. हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.


  गेल्या काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढली आहे. ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. १९ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या या या घटनेमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँक पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर आहे. ज्या परिसरात ही घटना घडली तेथेही कायम रहदारी असते. पोलिस ठाण्याच्या अगदी जवळ असलेल्या बॅंकेत चोरट्यांची टोळी येते अन् बॅंक फोडण्याचा प्रयत्न करते. या प्रयत्नात गॅस कटरचा अचानक स्फोट होऊन बॅंक जळून खाक होते. चोरटे बॅंकेला आग लावून पलायन करतात. तोपर्यंत पोलिसांना भणकही लागत नाही. चोरटे एवढे 'निवांतपणे' काम करतात आणि पोलिस यंत्रणा गाफील राहते. याचाच दुसरा अर्थ असा होतो की, शहरात पोलिस रात्रीची गस्त घालत नाही. हिच बाब यातून समोर येते. 


पोलिसांची रात्रीची गस्त शहरात असते की 'वरकमाई' मिळणाऱ्या परिसरात? हा मुद्दा पुन्हा एकदा नागरिकांच्या चर्चेत आला. एरवी दररोज रात्री  १० वाजता सायरन वाजवत रस्त्यावर फिरून दुकाना बंद करण्याची 'दवंडी' देत फिरणाऱ्या पोलिसांना चोरट्यांनी ही सणसणीत चपराक दिली आहे. गस्त रात्री १० वाजता पाहिजे की, पहाटेच्या सुमारास? यावरही आता पोलिसांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. 

बॅंक फोडण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. अशातला भाग नाही. यापूर्वीही स्टेशन रस्त्यावरील आयडीबीआय बॅंकेचे एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या साह्याने दोनदा फोडून लाखो रुपये लंपास केले. याचा शोधही अद्याप पोलिसांना लागलेला नाही. या घटनांचे उत्तरदायित्व फक्त पोलिसांवर सोपवून जमणार नाही तर बॅंकांची कुचकामी सुरक्षा यंत्रणाही तितकीच जबाबदार आहे. 

एटीएम असो की बॅंक शाखा. या सर्वांची सुरक्षा रामभरोसे आहे. कुणी सुरक्षारक्षक नसतो अथवा अन्य पर्यायी यंत्रणा. एटीएम व बॅंकांची सुरक्षा ही पोलिसांपेक्षाही बॅंक अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. परंतु घटनेनंतर घटनेचे 'पितृत्व' पोलिसांना बहाल केले जाते. बॅंकांच्या सुरक्षा यंत्रणेसह सायरन व सीसीटीव्ही कॅमेरे या यंत्रणा चोख पाहिजे. चोरटे बॅंक फोडून पळून जातात. परंतु बॅंकेतील यंत्रणा अलर्ट करीत नाहीत. त्यामुळे अशा कुचकामी यंत्रणेवर विचारमंथन होणे आवश्यक आहे. 

दुसरीकडे आग लागण्याच्या घटना घडल्यानंतर अग्निशमन यंत्रणा तात्काळ घटनास्थळी हजर व्हायला पाहिजे. परंतु शहरात असूनही घटनास्थळी येण्यासाठी तासभर लागतो. त्यामुळे ही यंत्रणा 'असून घात अन् नसून खोळंबा' असल्यासारखी गत आहे. या यंत्रणेबाबत धक्कादायक बाब समोर आली. अग्निशमन दलाच्या वाहनाचे ब्रेक निकामी झाले असून संबंधित यंत्रणेला हे ब्रेक बदलण्यासाठी पैसे नसल्याचा उपरोधिक टोला नागरिकांतून ऐकायला मिळत आहे. बहुतांश वेळा या वाहनात डिझेलही नसते. 

तहान लागल्यावर विहिरीची तयारी

जेव्हा आग लागल्याच्या घटना घडतात. तेव्हाच या वाहनात डिझेल भरण्याची संबंधितांना उपरती येते. थोडक्यात 'तहान लागल्यावर ही यंत्रणा विहीर खोदते'. असा हा गलथान कारभार सुरू आहे. परंतु असे असले तरी अग्निशमन दलाच्या वाहनाचालकाची मात्र कमालच म्हणावी लागेल. अशाही परिस्थितीत म्हणजेच अग्निशमन वाहनाचे ब्रेक निकामी झालेले असतानाही तो केवळ गियरच्या साह्याने वाहनावर नियंत्रण ठेवून तो घटनास्थळापर्यंत नेतोच. या घटनेनंतर अग्निशमन वाहन विलंबाने घटनास्थळी आल्यानंतर तीव्र शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला. परंतु चालकाच्या हाताबाहेरील या गोष्टी आहेत. वाहनातील बिघाड अन् डिझेलच्या कमतरतेमुळे त्याने वाहन कसे न्यायचे? हाही मोठा आणि गहन प्रश्न आहे. त्याच्या खिशातील पैसे टाकून तो वाहनाची दुरूस्ती करून डिझेल टाकू शकत नाही. त्यामुळे संबंधित पालिका प्रशासन झोपेत आहे का? आगीच्या घटनेत सर्व जळून खाक झाल्यानंतर वाहन येणार असेल तर ते काय कामाचे? पालिकेकडे दुरूस्तीसाठी पैसे नसतील तर आम्ही वर्गणी करून रक्कम द्यायची का? अशा तीव्र शब्दांत नागरिकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

 

एकंदरीतच शहरातील अशा घटना पाहता पोलिसांनी केवळ बाजारपेठ बंद करण्यासाठी सायरनच्या माध्यमातून दवंडी पिटून व्यापाऱ्यांवर दहशत न ठेवता चोरट्यांवर दहशत ठेवण्याची गरज आहे. हाकेच्या अंतरावर होणाऱ्या  घटनेमुळे पोलिसांनी धडा घेण्याची गरज आहे. केवळ 'मोक्याचे' ठिकाणं पाहून गस्त घालून चालणार नाही. चोरट्यांच्या यंत्रणेपेक्षा पोलिसांना आपली यंत्रणा सक्षम करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. बॅंकांनीही आपल्या कुचकामी यंत्रणेच्या भरवशावर न राहता तगडी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्याची गरज आहे. याशिवाय गेल्या अनेक दिवसांपासून बेभरवशीच्या अग्निशमन यंत्रणेलाही पालिकेने बळ देण्याची आवश्यकता आहे.