सात जणांची टोळी
वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बॅंक जळीतप्रकरणी (Bank fire in Vaijapur) छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या असून या घटनेत सहा ते सात जणांची टोळी असल्याचे समजते. दरम्यान चोरट्यांच्या टोळीने गुन्ह्यात वापरलेल्या स्विफ्ट कारचाही पोलिसांनी तपास केला असता ती कार मालेगाव येथील एका व्यक्तिच्या नावावर असल्याचे समजले.
शहरातील फुलेवाडी रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला (Maharashtra Gramin Bank Vaijapur) चोरट्यांकडून चोरीच्या प्रयत्नात आग लागून जळून खाक झाल्याची घटना २० एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करताना त्याचा स्फोट होऊन बॅंकेला आग लागल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. परंतु असे असले तरी घटनास्थळी असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. पोलिसांनी जप्त केलेल्या कारमध्ये पेट्रोलसह काही ज्वलनशील पदार्थ आढळून आले आहे. त्यामुळे पेट्रोल टाकून बॅंक पेटवून दिली की काय? या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे. ज्या अर्थी बॅंकेत स्फोट होऊन शटर रस्त्यावर येऊन पडते. त्याअर्थी चोरट्यांनी ज्वलनशील पदार्थाचा वापर केला असावा. असाही अंदाज बांधला जात आहे.
हा स्फोट नेमका कशाने झाला? याची पडताळणी करण्यासाठी न्यायवैद्यक ( फाॅरेन्सिक) पथकासह दहशतवाद विरोधी पथकाच्या पोलिसांनीही घटनास्थळी येऊन चाचपणी केली. गॅस कटर, ज्वलनशील पदार्थाशिवाय अन्य घातपात करण्याच्या हेतूने हा स्फोट घडविला गेला किंवा नाही. या पार्श्वभूमीवर या दोन्ही पथकांना पाचारण करण्यात आले होते. परंतु असे असले तरी पोलिस यंत्रणा अजूनही कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचली नाही. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून ही सहा ते सात जणांची टोळी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
त्यामुळे त्यानुसार पोलिस एक - एकाचा शोध घेऊन पुरावे जमा करीत आहेत. हा बॅंक लुटीचा प्रयत्न होता की, जाळण्याचा? याचाही अद्याप उलगडा झाला नाही. बॅंक लुटीचा चोरट्यांचा प्रयत्न होता तर स्फोट घडवून आणण्याचे कारण काय? चोरट्यांना चोरीच करायची होती तर मग हा उपद्व्याप कशासाठी केला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी वीरगाव ग्रामपंचायतीच्या बॅंक खात्यावरून ६४ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण घडले होते. या अपहाराची या घटनेला किनार असल्याची खुलेआम चर्चा नागरिकांत सुरू आहे. अपहाराचे प्रकरण रफादफा करण्यासाठीच हे जळीतकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे. परंतु पोलिसांनी याबाबत कोणताही दुजोरा दिलेला नाही. एकंदरीतच हे प्रकरण गुंतागुंतीचे झाले असून दोन दिवसांत पोलिस यंत्रणेला कोणत्याही निष्कर्षाप्रत पोहोचता आले नाही. पोलिसांनी दोघांना अटक केली असून ते तालुक्यातीलच आहेत . ही पूर्ण टोळी पकडल्यानंतरच या प्रकरणाचा उलगडा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
'ती' कार मालेगावच्या व्यक्तिच्या नावावर
दरम्यान पोलिसांनी जप्त केलेल्या कारच्या मालकाचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी ठरला. कारमध्ये दोन - तीन बनावट नंबर प्लेट सापडल्या. त्यामुळे या नंबर प्लेट बनावट असल्याचे सिद्ध झाले. परंतु पोलिसांनी त्याही पलिकडे जाऊन चेसीज व इंजिन नंबर शोधण्याचा प्रयत्न केला. चेसीज नंबर चोरट्यांनी अॅसिड टाकून बुजवून टाकला तर इंजिन नंबर स्पष्ट दिसून आला. याआधारे पोलिसांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यास बोलावून या कारच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता ती कार मालेगाव येथील एका व्यक्तिच्या नावावर असल्याचे समोर आले. परंतु असे असले तरी पोलिसांना यातून फारसे काही हाती लागेल. याची सुतराम शक्यता नाही. चोरट्यांनी या गुन्ह्यात सर्वच बाबी बनावट वापरल्या. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे.
Social Plugin