२५०० रुपयांची लाच घेताना अटक
वैजापूर: वारस कारवाई करून सातबारावर नावाची नोंद करण्यासाठी अडिच हजार रुपयांची लाच स्वीकारताना छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वैजापूर तालुक्यातील भायगाव सज्जेच्या महिला तलाठ्यास रंगेहाथ पकडले आहे. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमिता सुरेशराव लंगडे ( ३७ तलाठी सज्जा भायगाव रा. फुलेवाडी रस्ता, वैजापूर) असे या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदाराचे तालुक्यातील भायगाव येथील गट क्रमांक १६ मध्ये शेतजमीन आहे. ती जमीन तक्रारदाराच्या मयत आजोबांच्या नावावर असून तक्रारदाराचे वडीलही मयत आहेत.
तक्रारदाराच्या आजोबांच्या नावावर असलेली शेतजमीन तक्रारदार, त्यांची आई, चुलत्यांची नावे वारसा हक्कात नोंद करून ७/१२ देण्यासाठी तलाठी अमिता लंगडे हिने तक्रारदाराकडे ३०००/- रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपात प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानुसार २१ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून अमिता लंगडे हिला तिच्या वैजापूर येथील राहत्या घरी अडिच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक विजय वगरे, केशव दिंडे, अशोक नागरगोजे, साईनाथ तोडकर, चांगदेव बागुल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Social Plugin