गॅस कटरचा स्फोट होऊन लागली आग
वैजापूर: शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेला (Maharashtra Gramin Bank Vaijapur Branch) पहाटेच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत बँक पूर्णपणे जळून खाक झाली आहे. या घटनेत १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान चोरट्यांनी बँक लुटण्याच्या प्रयत्नात गॅस कटरचा वापर केला, मात्र त्यातून स्फोट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेतील चोरटे फरार झाले असून त्यांनी वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केले असून या वाहनातून दोन कोयत्यांसह बनावट नंबर प्लेट व ड्रम हस्तगत करण्यात आले आहे. पोलिस ठाण्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर चोरट्यांनी हे भयावह कृत्य करून पोलिसांनी तगडे आव्हान दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर शहरातील फुलेवाडी रस्त्यावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची शाखा असून २० एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास स्विफ्ट कारमधून आलेल्या चारजणांच्या चोरट्यांच्या टोळीने बँकेचे शटर गॅस कटरच्या साह्याने तोडण्याचा प्रयत्न करीत असताना गॅस कटरचा अचानक स्फोट होऊन त्यातून आगीचा भडका उडाला. त्यामुळे काही क्षणातच आगीने बँकेला कवेत घेतले अन् संपूर्ण इमारतीमध्ये आग पसरली. ही आग इतकी भीषण होती की, बँकेच्या इमारतीतील बहुतांश वस्तू आणि कागदपत्रे जळून खाक झाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बॅंकेला आग लागताच चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान बॅंकेत झालेला स्फोट व आगीच्या लोळाने परिसरातील नागरिकांनी बॅंकेकडे धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती वैजापूर पोलिसांना दिल्यानंतर पोलिस निरीक्षक श्यामसुंदर कौठाळेंसह सहकाऱ्यांनी धाव घेऊन तात्काळ अग्निशमन दलाच्या वाहनाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आजूबाजूच्या नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आग विझण्याचे नाव घेईना. घटनेनंतर तब्बल तासाभरानंतर म्हणजेच ४ वाजता पालिकेचे अग्निशमन वाहन घटनास्थळी आल्यानंतर आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. तब्बल पाच बंब टाकूनही आग आटोक्यात येत नव्हती. दुपारी दोन वाजेपर्यंत आगीचे तांडव सुरू होते. तोपर्यंत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले.
या घटनेत संगणक, संचिका, पंखे, फर्निचर ,टेबल, कपाट व अन्य साहित्य असे एकूण १५ लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. याप्रकरणी बॅंक व्यवस्थापक बजरंगलाल ढाका यांच्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथील श्वानपथकासह फाॅरेन्सिक पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनीही घटनास्थळी भेट दिली. आगीच्या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चोरट्यांनी या गुन्ह्यासाठी वापरलेली गाडी घटनास्थळाजवळ सापडली आहे. प्राथमिक तपासात ही गाडी चोरीची असल्याचे समोर आले आहे. पोलिस आता गाडीच्या मालकाचा शोध घेत असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांचा शोध घेत आहेत.
आले वाहनाने अन् गेले पायी!
दरम्यान गॅस कटरचा स्फोट होऊन बॅंकेला आग लागल्यानंतर शटर थेट रस्त्यावर येऊन पडले अन् शटरमध्ये चोरट्यांचे वाहन अडकले. शटरमध्ये अडकलेले वाहन चोरट्यांनी काढण्याचे भगिरथ प्रयत्न केले. परंतु वाहन निघत नसल्याने त्यांना तिथेच सोडून देण्याची नामुष्की ओढवली. परिणामी त्यांना वाहनाविना जाण्याची वेळ आली.
खातेदारांच्या पैसे सुरक्षित
या घटनेमुळे बॅंकेचे कामकाज काही दिवसांसाठी विस्कळीत होणार आहे. परंतु असे असले तरी खातेदारांच्या पैशांना अथवा ठेवींना कोणताही धोका नाही. बँकेतील सर्व व्यवहार लवकरच पूर्ववत होतील. खातेदारांनी घाबरून जाऊ नये. त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असल्याचे बॅंक सूत्रांनी स्पष्ट केले.
विशेष पथके गठित
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले आहे. गॅस कटरच्या स्फोटामुळे आग लागल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला असला तरी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. यामध्ये बँकेच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आहेत किंवा नाहीत? या दिशेनेही तपास सुरू आहे. गॅस कटरमुळे हा स्फोट झाला असल्याचा प्राथमिक कयास वर्तविला जात असला तरी घटनास्थळी असे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. या आगीत ते साहित्य भस्मसात झाले असावे. असाही अंदाज लावला जात आहे.
Social Plugin