Hot Posts

6/recent/ticker-posts

Vaijapur Municipal Council | पालिकेत 'हम करे सो कायदा; 'नोकरीला आले अन् मालक झाले'

अभ्यागतांना केले जाते 'शब्दबंबाळ'

वैजापूर नगरपालिकेच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली असताना याकडे पुढाऱ्यांना लक्ष द्यायला वेळ आहे ना वरिष्ठ अधिकाऱ्यांना. समस्या घेऊन आलेल्या अभ्यागतांच्या समस्या ऐकून न घेताच 'शब्दबंबाळ' करून पिटाळून लावले जाते. 'सेनापतीं'सह बहुतांश कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी राहून 'उंटावरून शेळ्या राखण्यासारखा' पालिकेचा कारभार पाहतात.  एकंदरीतच पालिकेत सध्या 'हम करे सो कायदा' सुरू असून 'नोकरीला आले अन् पालिकेचे मालक झाले'. अशी अवस्था झाली आहे.


साधारणतः दोन वर्षांपूर्वी पालिका सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर तत्कालीन मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्याकडे प्रशासक पदाची सूत्रे हाती आली. परंतु सहा महिन्यांपूर्वी त्यांची बदली झाली अन् कारभार दुसऱ्या अधिकाऱ्याचा हाती गेला. तेव्हापासून शहराला 'अवकळा' आली आहे. खुल्या गटारींसह भूमिगत गटारी ओसंडून वाहू लागल्या आहेत. स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब सुरू झाली आहे. अशुद्ध पाणीपुरवठा, शहराच्या चोहोबाजूंनी साचलेले कचऱ्यांचे ढीग, शहरात डासांनी मांडलेला उच्छाद, अधिकाऱ्यांची मनमानी हे आता कायमचेच झाले आहे.

 बाहेरून शहरात येणाऱ्यांचे स्वागत कचऱ्यांच्या ढीगाने होते. यापेक्षा बकाल अवस्था शहराची काय असू शकते? सेनापतीच अपडाऊन करतात. त्यांच्या मावळ्यांबाबत न विचारलेलेच बरं! दुपारी १२.३० वाजता कार्यालयात यायचं. दोन वाजेपर्यंत थांबायचे अन् पुन्हा पाच वाजता पालिकेत 'आराम' करून यायचे. तोपर्यंत समस्या घेऊन आलेल्या अभ्यागतांची कंटाळून - कंटाळून 'वाट' लागलेली असते. अभ्यागतांना अधिकाऱ्याची एवढी प्रतीक्षा करावी लागत असेल तर ते कशाला थांबतील. प्रतीक्षा करूनही त्यांची समस्या तर सुटत तर नाहीच. त्याबदल्यात त्यांना अधिकाऱ्यांकडून तुसटपणाची वागणूक मिळून 'शब्दबंबाळ' होण्याची वेळ येते.

 अभ्यागतांची भेट घेणे हे अगोदर अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. समस्या, प्रश्न जाणून घेणे हा नंतरचा भाग आहे. परंतु अभ्यागतांना पहिला प्रश्न पडतो की, भेटायचे कुणाला व कुठे? कारण अधिकारी 'ठिकाणा'वर नसतात. सेनापतीप्रमाणेच त्यांच्या खालोखाल असणारे काहीजण दुसरीकडे  राहून कारभार पाहतात. त्यांच्याही असंख्य तक्रारी आहेत.

 त्यातही त्यांचा डामडौल, मग्रुरी, आडदांडपणा पाहता विचारता सोय नाही. शासनाकडून गलेलठ्ठ पगार घ्यायचा अन् कामे न करता अभ्यागतांना 'सुनावून' घ्यायचे. असंच सध्या सुरू आहे.  पालिकेत सध्या समस्यांना प्राधान्य तर नाहीच. परंतु अभ्यागतांना मोठ्या युक्तिवादाला सामोरे जावे लागते. 

न्यायालयात एखाद्या खटल्यावर जेवढा युक्तिवाद होत नसेल, तेवढा येथे होतो. अधिकारी समस्या सोडवण्याऐवजी प्रश्नांमध्ये गुरफटून अभ्यागतांना पिटाळून लावतात. त्यामुळे येणारा हेही विसरून जातो की, आपण कशासाठी आलो होतो? अधिकारी पालिकेचे मालक नव्हें तर जनतेचे नोकर असतात. याचे धडेही आता पालिकेतील अधिकाऱ्यांना देणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराबाबत सध्या जिकडे-तिकडे चोहीकडे आनंदी- आनंद गडे' असेच म्हणता येईल. हा कारभार सुधारेल. तो सुदिन उगवला म्हणायचा! तोपर्यंत मात्र शब्दबंबाळ होण्याशिवाय पर्याय नाही.

अवघड दुखणं अन् जावई डाॅक्टर!
पालिकेतर्गंत काम करणाऱ्या ठेकेदारांची अवस्था म्हणजे 'अवघड दुखणं अन् डाॅक्टर जावई' अशी झाली आहे. कामांची अचानक 'टक्केवारी' वाढविल्याने हे दुखणं सांगायचे कुणाला? असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यामुळे ठेकेदार आता काढता पाय घेऊ लागले आहे. काम नाही मिळाले तरी चालेल पण कुणाचे 'घर' भरायचे नाही. असा पवित्रा त्यांनी घेतला आहे. सध्या शहरात ठेकेदारांच्या मुस्कटदाबीची खुलेआमपणे चर्चा सुरू आहे. कोण किती टक्केवारी मागतो. हे आता झाकून राहिले नाही. एकंदरीत नोकरदारच पालिका लुटून खायला निघाले असल्याचे समोर येत आहे. 

..तरच होईल भांडाफोड 
वैजापूर पालिकेवर गलथान कारभाराचा ठपका ठेवून जिल्हाधिकाऱ्यांनी आडदांड अधिकाऱ्याला नोटीस बजावली खरी! परंतु केवळ नोटीस देऊन हा गलथान कारभार थांबणार नाही.  त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी न. प. कार्यालयाची झाडाझडती घेऊन तेथे काय चालू आहे. याची शहानिशा केली पाहिजे. त्यानंतरच अधिकाऱ्यांच्या प्रतापाचा भांडाफोड होईल.