Hot Posts

6/recent/ticker-posts

Thanksgiving ceremony | गौरव नारीशक्तीचा: अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशाताईंचा कृतज्ञता सोहळा

महिलांना दिली भेटवस्तू 


वैजापूर: जागतिक महिला दिनानिमित्त डाॅ. अमोल अन्नदाते, आनंद ग्रुपच्यावतीने वैजापूर तालुक्यातील आशाताई, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनिसांच्या कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील  प्रमिलाताई धुमाळ मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास 300 पेक्षा अधिक महिलांच्या  कार्याचा गौरव करुन त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्षा आनंदीताई अन्नदाते, डाॅ. अभिजित अन्नदाते, डाॅ. अमोल अन्नदाते, डाॅ. प्रविणा अन्नदाते, प्रकाश गायके आदी उपस्थित होते. 

यावेळी डाॅ. अमोल अन्नदाते म्हणाले की, वैजापूर तालुक्यात आरोग्य वारीच्या निमित्ताने जात असताना गावात  फक्त आरोग्याचे प्रश्न नाहीत तर अनेक गावांमध्ये पाण्याचा प्रश्न, खराब रस्ते, व अन्य पायाभूत सुविधांचा अभाव आहे.  या परिस्थितीमध्येही अंगणावाडी सेविका, आशाताई जे काम करतात. त्यांचे मला कौतुक वाटते. आरोग्यवारीच्या माध्यामातून पाणी, रस्ते, रोजगाराचे प्रश्न समोर आले आहेत. त्यावर उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे. 


ते पुढे म्हणाले की, कित्येक घरांमध्ये आशाताई आणि अंगणवाडी सेविका या कमावणा-या एकमेव व्यक्ती आहेत. प्रत्येकीच्या संघर्षाची कहाणी वेगळी आहे. प्रत्येकीच्या आयुष्यावर चित्रपट निघेल. अशी त्यांची कथा आहे. मी लवकरच त्यांच्या संघर्षाची कहाणी पुस्तकरुपात मांडणार आहे.  आज गावपातळीवर सर्वात जास्त काम करणाऱ्या आशाताई, अंगणवाडी सेविका या विविध सुविधांपासून दुर्लक्षित आहेत. मात्र मला अभिमान आहे की अंगणवाडी सेविका, आशाताई या माझ्या बहिणी आहेत. मी त्यांच्यासाठी काम करत राहणार आहे, असे  डॉ. अन्नदाते यांनी यावेळी सांगितले.