दोनदा लिलाव बंद पाडून लावले टाळे
वैजापूर: शहराबाहेरून जाणाऱ्या नागपूर- मुंबई महामार्गालगत असलेल्या कांदा मार्केटमध्ये व्यापारी मनमानी दराने कांदा खरेदी करीत असल्याचा आरोप करून संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवार (ता.२१) रोजी सकाळच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करून लिलाव बंद पाडून कांदा मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.
नागपूर-मुंबई महामार्गालगत असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये मागील दोन दिवसांपासून कांद्याची आवक बऱ्या प्रमाणात वाढली आहे. शुक्रवारी कांदा मार्केटमध्ये जवळपास तीनशे वाहनांची आवक होती. सकाळच्या सत्रात कांद्याची लिलाव प्रक्रिया सुरू झाली. मात्र व्यापाऱ्यांनी हलका कांदा आठशे रुपये तर उच्च प्रतीचा कांदा बाराशे रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांनी लिलाव तत्काळ बंद पाडला.
पश्चिम महाराष्ट्रातील बाजारपेठेत उच्च प्रतीच्या कांद्याला वाढवा भाव मिळत असताना येथे बाराशे रुपये भाव कसा ? असा प्रश्न यावेळी शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना करीत जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान हा सर्व घटनाक्रम सुरू असताना बाजार समितीचा एक संचालक वगळता अन्य कोणत्याही संचालकांनी तेथे जाण्याची तसदी घेतली नाही. शेतकऱ्यांनी रौद्ररूप धारण केल्याने सचिव प्रल्हाद मोटे यांनी व्यापारी व शेतकऱ्यांंमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर लिलाव पुन्हा सुरू झाला.
परंतु थोड्यावेळाने दराच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी पुन्हा लिलाव बंद पाडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कांदा बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान बाजार समितीचे पदाधिकारी हे व्यापाऱ्यांच्याच ओंजळीने पाणी पित असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला. दुपारी तीन वाजेपर्यंत कांदा लिलाव सुरू होऊ शकला नव्हता.
एकच कांदा; भाव मात्र वेगवेगळा
कांदा लिलावा दरम्यान एकाच शेतातील कांदा दोन वाहनात आणलेला असतांना व्यापाऱ्याने छोट्या वाहनातील कांदा पंधराशे रुपये दराने तर त्याच शेतातील मोठ्या वाहनात आणलेला कांदा हा बाराशे रुपये दराने घेतल्याचा सांगत व्यापारी शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचा आरोप केला.
रोखीमुळेच खरेदीचे दर कमी
शेतकऱ्यांकडून वायद्यावर कांदा घेतल्यास व्यापाऱ्यांना खेळतं भांडवल असते. त्यामुळे शंभर ते दीडशे रुपये अधिकच्या दराने कांदा खरेदी करण्यास परवडते. मात्र मागील काही दिवसांपूर्वी सागर राजपूत या व्यापाऱ्यांने शेतकऱ्यांना कोटींना गंडविल्यानंतर बाजार समितीने कांद्याच्या पट्ट्या शेतकऱ्यांना रोख स्वरूपात देणे बंधकारक केल्याने व्यापाऱ्यांना ठराविक भांडवलात व्यवसाय करावा लागत आहे. त्यामुळेच कांदा खरेदी कमी दराने होत असल्याचे एका कांदा व्यापाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
Social Plugin