वैजापूर: 'सरकारी काम अन् महिनोन्महिने थांब' याची प्रचीती दस्तूरखुद्द विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांनाच आली. घरकुल लाभार्थ्यांसाठी निधी (Gharkul Yojana Funds) मंजूर होऊन तो महिनोन्महिने लाभार्थ्यांच्या खात्यावर पडत नाही. सात महिन्यांत तीन घरकुल लाभार्थ्यांचे निधन झाले. तरीही त्यांच्या खात्यात रक्कम पडली नाही. असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Member of Legislative Council Ambadas Danve) यांनी विधान परिषदेत केला. तसेच पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना (Vaijapur Panchayat Samiti BDO) सक्त ताकीद देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी हा गौप्यस्फोट केल्यामुळे गटविकास अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचे पितळ उघडे पडले आहे.
वैजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या गलथान कारभाराचे विधान परिषदेत अक्षरशः वाभाडे निघाले. घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाने निधी मंजूर करून तो निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पडायला सात महिने लागतात. जूलै २०२४ मध्ये निधी मंजूर झाला अन् तो निधी मार्च २०२५ मध्ये वाटप करायला सुरुवात होते? याचा अर्थ नेमका काय? या सात महिन्यांत तीन लाभार्थ्यांचे निधन झाले. त्यामुळे या लाभार्थ्यांबाबत सरकारचे धोरण काय असणार आहे? असे प्रश्न विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केले.
वैजापूर तालुक्यात टप्पा क्रमांक दोनमध्ये ८८ घरकुलांना मंजुरी आहे. परंतु तांत्रिक मान्यता नाही. त्यामुळे सरकारने याबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. असेही दानवे म्हणाले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनुदान मिळत नसल्यामुळे घरकुल लाभार्थ्यांकडून ओरड सुरू होती. परंतु पंचायत समिती कर्मचारी बॅंक खात्याला आधार लिंक नाही यासह विविध सबबी सांगून लाभार्थ्यांना पिटाळून लावीत होते. परंतु मंजूर निधी अद्याप लाभार्थ्यांच्या बँक खात्यात टाकलाच नाही. याचा खुलासा कुणीच केला नाही.
परिणामी लाभार्थ्यांना बॅंक खात्यासंबधी काहीतरी तांत्रिक अडचणी असतील. असे गृहीत धरून त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु आलेला निधी अद्याप वाटप झालाच नाही. याबाबतचा गौप्यस्फोट दानवेंनी विधान परिषदेत केल्यानंतर लाभार्थ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या नावाने 'शिमगा' करायला सुरुवात केली. घरकुलांचा मंजूर निधी तब्बल सात महिने वाटपाविना पडून राहतो म्हणजे गटविकास अधिकारी किती 'तत्पर' आहे. याची प्रचीती येते. शासनातील अशा चाकरमान्यांना खरोखरच ताकीद देण्याची गरज आहे.
अगोदरच घरकुलांसाठी येणाऱ्या अडचणींवर मात करून लाभार्थी जुळवाजुळव करतात अन् त्यात नियोजनशून्य व ढिसाळलेली यंत्रणा 'नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न' या उक्तीप्रमाणे काम करते. लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यापासून ते हप्ते बॅंक खात्यात पडेपर्यंत यंत्रणेतील चटावलेल्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे 'चोचले' पुरवावे लागतात. हे करता - करता लाभार्थ्यांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे अशा गलथान कारभारास जबाबदार असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीबाबत वरिष्ठांनी जाब विचारण्याची आवश्यकता आहे.
घरात राहण्याचे स्वप्न भंगले
प्रत्येकाच्या आयुष्यात आपलं स्वतःचं एक घर असावे. असं स्वप्न असतं. घरकुल मंजूर झाले. कामही झाले. परंतु रहायला ते स्वतःच नाही राहिले. सात महिन्यांत निधी वाटपाविना पडून होता. परंतु तोपर्यंत ते तीन लाभार्थी हयात असताना निधी मिळाला नाही. त्या तिघांचे दरम्यानच्या काळात निधन झाले. आता हा निधी मिळणार की नाही? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहे.
Social Plugin