Hot Posts

6/recent/ticker-posts

Child Marriage | थाटामाटात लग्न पार पडले अन् 'नवरदेवा'वरच गुन्हा दाखल झाला! काय आहे प्रकरण?

बालविवाह करणे भोवले; पोलिसांत फिर्याद 


वैजापूर: तालुक्यातील भायगाव येथे १६ वर्षीय मुलीचा बालविवाह लावून देणाऱ्या मंडळीसह नवरदेवाविरुद्ध वैजापूर पोलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सागर सुरेश कदम (२५ रा. रस्ते सुरेगाव, ता.येवला जि. नाशिक) व इतरांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील भायगाव येथील एका सोळा वर्षीय मुलीचा १६ मार्च रोजी दुपारी रस्ते सुरेगाव येथील २५ वर्षीय तरुण सागर कदम याच्याशी बालविवाह लावण्यात आला असल्याची माहिती ग्रामसेवक विजय क्षीरसागर यांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथून सचिन दौड यांनी २१ मार्च रोजी कळविले. 

दरम्यान या बालविवाहाचे फोटो देखील  दौड यांनी ग्रामसेवक क्षीरसागर यांना व्हाॅट्सअॅपला पाठविले. याशिवाय दौड यांनी ग्रामसेवकाला  महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारन भाग चार (अ) अधिसुचना दिनांक ३ जुन २०२३ नुसार ग्रामपंचयात क्षेत्रात ग्रामसेवक हे बालविवाह प्रतिबंध अधिकारी म्हणून नियुक्त घोषित केलेले आहेत. असे कळविले. सदरील घटनाक्रम हा  ग्रामपंचयात कार्यक्षेत्रात झाला असल्यामुळे सदर प्रकरणी बालिकेच्या वयाबाबतची व विवाह झाला असल्याची चौकशी करुन बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ व नियम २००८ अन्वये योग्य ती कारवाई करावी व बालविवाह प्रतिबंध करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालयात सादर करावा. असे आदेशीत केले होते. 

त्या अनुषंगाने क्षीरसागर यांनी पंचासमक्ष मुलीचा वडिलांकडे चौकशी केली असता मुलीचे वय सोळा वर्ष असल्याचे व मुलीचे सागर कदम याच्याशी लग्न लावून दिल्याचे त्यांनी कबुल केले. याप्रकरणी ग्रामसेवक विजय क्षीरसागर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सागर कदम याच्यासह त्याचे व मुलीच्या आईवडिलांविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.