भरगच्च कार्यक्रमात एकेरी उल्लेख
वैजापूर: अधिकाऱ्यांमध्ये किती उध्दटपणा असावा. हे वैजापूरकरांनी 'याची देही, याची डोळा' अनुभवले. एका भरगच्च कार्यक्रमात ध्वनीक्षेपकावरून पालिका अधिकाऱ्यांनी 'पम्या कुठे गेला.?' असं विचारून आपण किती 'संस्कारशील' हे दाखवून दिले. सध्या उध्दटपणाचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
त्याचे झाले असे की, नगरपालिकेच्यावतीने विविध शाळांतील विद्यार्थ्यांची शहरातून स्वच्छता फेरी काढण्यात आली. शहरातील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर फेरीचा समोरोप करण्यात येऊन ठिकाणी एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमाच्या आभारानंतर अधिकाऱ्याच्या जीभेचा तोल गेला अन् पालिकेत स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव सरळ न घेता दोनवेळा 'पम्या..पम्या कुठे गेला..?' असा प्रश्न विचारून 'मला पम्या दिसत नाही.?' असे म्हणून पालिकेला बक्षीस मिळाले तर ह्यांच्यामुळे अन् गेले तर ह्यांच्यामुळे! आपण परिश्रम घेत राहायचे.
पुढे आणखी त्यांच्या जिभेचा तोल सुटला अन् पुन्हा 'ह्यांना कुणी पम्या म्हणायचे नाही पोरांनो, ते साहेब आहेत' असे सांगत विद्यार्थ्यांना उपदेशाचे 'डोस' पाजळले. परंतु हे डोस पाजळत असताना त्यांनी स्वतः उध्दटपणाचा कळस गाठून तीनवेळा 'पम्या' म्हणून घेतले. विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देता - देता आपण नेमके कशाचे धडे देत आहोत. याचे बहुतेक पालिका अधिकाऱ्यांना नसावे.
शहरात स्वच्छतेचे 'धिंडवडे' निघाले असतानाच फेरीच्या माध्यमातून पालिका कशाचे 'धडे' देऊ पाहतेय? हे एक न उलगडलेले कोडे आहे. एकीकडे 'ते साहेब आहेत, त्यांना पम्या म्हणू नका' म्हणून मुलांना उपदेशाचे 'डोस' पाजले जातात. असं म्हणतात की विद्यार्थी अनुकरणशील असतात. यातून विद्यार्थ्यांनी नेमके कोणते अनुकरण करायचे? हाही मोठा प्रश्न आहे.
कार्यालयप्रमुख असले म्हणून तुम्हाला एकेरी व उध्दटपणाने नाव घेण्याचा अधिकार कुणी दिला? तशी शासन निर्णयात तरतूद आहे का? स्वच्छता कर्मचारी आहे म्हणून तुम्ही त्याला उध्दटपणाने संबोधणार का? असेही प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. ज्या कुणाचे नाव अशा पध्दतीने घेतले. त्यापेक्षाही ज्यांनी घेतले त्यांचे यातून 'संस्कार आणि उध्दटपणा' अधोरेखित होतो. एवढं मात्र नक्की!
Social Plugin