प्रक्षोभक पोस्ट करणाऱ्यांना सहआरोपी
नागपूर: कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकाविरूद्ध अत्यंत कठोर कारवाई करू. त्यांच्याकडून नुकसानभरपाईही वसूल केली जाईल. गरज पडल्यास अशांच्या मालमत्तांवर बुलडोझरही चालवू आणि त्यावर आवश्यकता भासल्यास अशा प्रवृत्तींना कुचलून टाकू, असा कडक इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी दिला. पोलिस आयुक्तालयात कायदा व सुव्यवस्थेच्या बैठकीनंतर पत्रपरिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. याचसोबत सोशल मीडियाची पडताळणी करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा याला चिथावणी देण्यासाठी पोस्ट केल्या. त्या सगळ्यांना समाजकंटासोबतच सहआरोपी बनवले जाणार आहे. कारण त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हा हिंसाचार (Social media violence) भडकावण्यासाठी मदत केलेली आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
हिंसाचाराच्या घटनेत मालमत्तेचे तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीसंदर्भात पंचनामे करुन येत्या तीन ते चार दिवसात भरपाई दिली जाईल. संपूर्ण नुकसानीची भरपाई समाजकंटकांकडून करण्यात येईल. नुकसानभरपाई करताना संमाजकंटकांच्या मालमत्तेची विक्री करण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले. हल्लेखोरांवर कठोर कलमे लावली जाईल.याप्रकरणी बांग्लादेशी वा विदेशी हात आहे का? याचीही चौकशी सुरू आहे. मालेगाव कनेक्शन असल्याचे यात दिसत असून, ज्या पक्षाचे पदाधिकारी आरोपी आहेत, त्यांनी मालेगावातून निधी गोळा केला होता, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
महिलांशी असभ्य वर्तन नाही
महिला पोलिसांचा विनयभंग केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाकारले, त्यांच्यासोबत अभद्र व्यवहार केल्याचेही पोलिस आयुक्तांच्या चौकशीत आढळले नाही. मात्र, हल्लेखोरांनी त्यांच्यावर दगडफेक केली होती. अशा आरोपींची टप्प्याटप्प्याने माहिती काढली जात आहे. या घटनेमागे राजकीय हेतू असल्याचे नाकारत मुख्यमंत्र्यांनी या घटनेपूर्वी असे काही होऊ शकते असे संकेत मिळाले होते, असा दावा केला. मात्र, तपास पूर्ण होत नाही, तोवर अधिक बोलणे उचित नाही. पोलिस आयुक्त यावर अधिक स्पष्टीकरण देतील. तर, गुप्तचर यंत्रणा अपयशी नव्हे तर माहिती घ्यायला फारच अल्पावधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. शहरातील बंद असलेले सर्व सीसीटीव्ही लवकरच सुरू होतील. शिवाय, नवे सीसीटीव्ही लावण्यासाठी निधीही दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
१०४ जणांची ओळख पटली
१०४ लोकांना आतापर्यंत अटक करण्यात आली. यातील ९२ लोकांवर कारवाई सुरू आहे. १२ जण अल्पवयीन असून त्यांच्यावर त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. दंगा करणारा, त्यांना मदत करणाऱ्या सर्वांवर कारवाई करू. सोशल मीडियाचे ट्रॅकींग सुरू आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पंतप्रधानांचा दौरा होणारच
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा ठरल्याप्रमाणे होईल. त्यात कुठलीही अडचण नाही. घटना एका भागात घडली. शहराच्या ८०-९० टक्के भागातील जनजीवन सुरळीत सुरू आहे. काहीच भागात संचारबंदी आहे. यामुळे या भागातील बाजारपेठा बंद आहेत. रविवारपासून पोलिस संचारबंदीबाबत निर्णय घेतील. त्यानंतर शहरातील बाजारपेठ व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत होईल, असे फडणवीस म्हणाले.
घटनेतील जखमीचा मृत्यू
नागपुरात हिंसाचारादरम्यान इरफान अन्सारी जखमी झाला होता. त्याचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेयो रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. अन्सारी हा व्यवसायाने वेल्डर होता. तो १७ मार्च रोजी रात्री ११ वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरून इटारसीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी घरून निघाला. पण या काळात हिंसाचाराचा बळी ठरला.
राज्यात या गोष्टी सहन होणार नाही!
नागपूरमध्ये किंवा महाराष्ट्रात कुठेही या गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. नागपूरचा एक शांततेचा इतिहास आहे. १९९२ नंतर नागपूरमध्ये केव्हाही अशा प्रकारची मोठी घटना घडली नाही. किरकोळ घडल्या असतील. त्यामुळे आता दंगेखोरांना सरळ केले नाही, तर त्यांना अशी सवय लागेल. त्यामुळे या प्रकरणी कोणतीही सहिष्णुता बाळगली जाणार नाही, तशा सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Social Plugin