महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा
घरकुल बांधणाऱ्या (Gharkul) लाभार्थींना आता राज्य सरकारने (State Government) आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील घरकुल लाभार्थींना मोफत वाळू मिळणार आहे. यासाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा घरकुल बांधत असलेल्या लाखो लाभार्थींना होणार आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, ज्या ठिकाणी वाळू घाटांचा लिलाव झालेले नाहीत. आम्हाला एन्व्हायरमेंट क्लियरन्स मिळाला आहे. त्या ठिकाणी वाळू घाटांचा लिलाव होईल. तसेच घरकुलांना पाच ब्रास मोफत रेती देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यासाठीही आम्ही तरतूद करणार आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.
एकंदरीत जेवढी मागणी असेल, तेवढा पुरवठा असे वाळू धोरण आपण तयार करत आहोत. त्यासाठी एम सँड धोरण येत आहे. त्यामध्ये दगड खाणींमधून येणाऱ्या वाळूसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये स्टोन क्रशरसाठी प्रोत्साहन देत आहोत. त्यामाध्यमातून दगडापासून मोठ्या प्रमाणात वाळू तयार होणार असून, त्यामुळे नदीतील वाळूची मागणी कमी होईल. तसेच येत्या दोन वर्षांत वाळूची मागणी आणि पुरवठा यामध्ये जी काही तफावत आहे ती दूर होईल. असेही ते म्हणाले.
दरम्यान ग्रामीण भागात पंचायत समितीच्या विविध योजनेच्या माध्यमातून लाभार्थींना घरकुले मंजूर करण्यात आली आहे. परंतु बांधकामासाठी वाळू उपलब्ध होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांची घरकुले रखडून आहेत. यापूर्वीही शासनाने घरकुल लाभार्थींना मोफत वाळू देणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु महसूल विभागातील यंत्रणा लाभार्थींना वाळू देणे तर दूरच परंतु वाळू घाटांचे लिलाव करून ठेकेदारांबरोबरच स्वतःचे 'चांगभलं' करून घेण्यात मश्गूल आहेत.
Social Plugin