Hot Posts

6/recent/ticker-posts

MSEDCL Samat meter | वैजापुरात बसविणार १२५०० 'स्मार्ट मीटर', 'हेराफेरी' सांगून महावितरण कर्मचाऱ्यांची महा'वसुली

ग्राहकांना दिला जातोय 'शाॅक'


वैजापूर: महावितरण कंपनीकडून शहरात 'स्मार्ट मीटर' बसविण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून आतापर्यंत शहराच्या विविध भागात जवळपास पाच हजार मीटर बसविण्यात आले आहेत. साधारणतः वर्षभरात ही मोहीम पूर्णत्वास गेल्यानंतर वीजचोरीला आळा बसण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. दरम्यान एकीकडे स्मार्ट बसविले जात आहे तर दुसरीकडे ग्राहकांचे मीटर काढून तपासणीसाठी पाठवून महावितरणचे कर्मचारी 'मखलाशी' करीत आहेत. परिणामी अशा ग्राहकांना 'शाॅक' बसत आहे. परंतु मीटर तपासणी करायची नसल्यास कर्मचाऱ्यांना 'लक्ष्मी' प्रसाद रुपाने दिल्यास ही प्रक्रिया रद्द होते. हेही विशेष!

राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी 'स्मार्ट मीटर' ही संकल्पना अस्तित्वात आणली. सध्या हे काम राज्यभरात युद्धपातळीवर सुरू आहे. वीजचोरी रोखणे हा मुख्य उद्देश ठेवून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शहरासह तालुक्यात ही संकल्पना राबविली जात आहे. प्रथम शहरातील घरगुतीसह औद्योगिक व वाणिज्य वापरकर्त्यांना स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर ही मोहीम ग्रामीण भागात सुरू करण्यात येणार आहे. 

शहरातील लाडगाव रस्ता, सुंदर गणपती गल्ली, शिवराई रस्ता आदी भागात ४ हजार ७७३ स्मार्ट मीटर बसविण्यात आले आहेत. महावितरणच्या उपविभाग क्रमांक एकमध्ये एकूण २३ हजार ७७७ ग्राहकांचा समावेश असून यात शहरही येते. शहरात एकूण १२ हजार ५०० ग्राहक असून यामध्ये घरगुती ९ हजार ३२३, औद्योगिक ३९० व वाणिज्य३६२ ग्राहकांचा समावेश आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम तालुक्यात नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे.

दरम्यान महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरू असली तरी दुसरीकडे महावितरणच्या काही कर्मचारी स्वतःचा 'महसूल' वाढविण्याचा चंग बांधला आहे. महावितरणची 'वसुली' करता -करता स्वतःची 'वसुली' करण्यावर भर देत आहेत. मीटरमध्ये 'हेराफेरी' दाखवून ग्राहकांना मीटर तपासणीसाठी पाठविण्याची धमकी दिली जात आहे. परंतु जर कर्मचाऱ्याला 'लक्ष्मी' रुपात 'प्रसाद' दिल्यास मीटर तपासणीसाठी जात नाही. हेही विशेष! याबाबत शहरातील ग्राहकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहेत.

काय आहेत वैशिष्ट्ये ?

सध्या घरोघरी स्मार्ट मीटर बसविण्यात येत आहे. या माध्यमातून वीजचोरी रोखण्यासाठी मदत तर होईलच; परंतु अचूक रिडिंग, मनुष्यबळ कमी होईल. टाईम ऑफ डेट ( टीओडी) नुसार ही रिडिंग असणार आहे. याशिवाय यात सीमकार्डही असणार आहे.

मीटरमध्ये 'हेराफेरी' करणाऱ्यांना दंड 

महावितरण कंपनीच्या पथकाकडून शहरासह तालुक्यातील १३५ ग्राहकांचे मीटर तपासणीसाठी पाठविले असता यातील ४४ ग्राहकांच्या मीटरमध्ये 'हेराफेरी' करून वीजचोरी केल्याचे उघडकीस आले. या वीजचोरीपोटी १३ लाख ८६ हजार ५३० रुपयांचा दंड महावितरणच्या कंपनीकडून ठोठावण्यात आला.

प्रीपेड आणि पोस्टपेड!

स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड आणि पोस्टपेड अशी व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे मीटरमध्ये सीमकार्ड देण्यात आले असून हे कार्ड सध्या सक्रिय (ॲक्टिव्हेट) नाही. परंतु शासन आदेशानुसार जेव्हा हे सीम ॲक्टिव्हेट करण्यात येतील तेव्हा सीमला ग्राहक क्रमांक संलग्न करण्यात येईल. प्रीपेड ग्राहकांसाठी सेम मोबाईल सीमनुसार सुविधा मिळणार आहे. एकंदरीतच जी रक्कम भरावी तेवढी वीज वापरायला मिळेल तर तर पोस्टपेड ग्राहकांसाठी महिन्याला देयक भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. परंतु हा निर्णय संपूर्ण स्मार्ट मीटर बसविण्यात आल्यानंतर होईल. असे महावितरण कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.