Hot Posts

6/recent/ticker-posts

ICDS Case | 'त्या' अंगणवाडी सेविकेला पदावरून करणार कमी; आहार सडेपर्यंत काय करतात पर्यवेक्षिका?

 अंगणवाडीचे सडलेले अन्नपुरवठा प्रकरण


वैजापूर: अंगणवाडीच्या चिमुकल्यांना चक्क सडलेला व कालबाह्य झालेला अन्नपुरवठा झाल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील एकोडीसागज येथील ग्रामस्थांनी उघडकीस आणला. ग्रामस्थांनी हा आहार एका वाहनात भरून थेट पंचायत समिती कार्यालयासमोर आणला. यामुळे एकच खळबळ उडाली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील अंगणवाडयांच्या पोषण आहाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एकोडीसागज येथील अंगणवाडीत काही ग्रामस्थ गेले असता त्यांनी पोषण आहाराची तपासणी केली असता यातील वाटाण्यासह गव्हाचा भरडा, हरभरा, तांदूळ, मुगडाळ आदी खाद्यपदार्थांची पाकिटे मुदतबाह्य झालेली दिसली. पुरवठा केलेले अन्नधान्य हे सन २०१९, २०,२१ व २२ या वर्षातील असल्याचे समजले. त्यामुळे ग्रामस्थांनी प्रभावी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना Integrated Child Development Services (ICDS) Department भ्रमणध्वनीव्दारे कळवून हा प्रकार सांगितला. परंतु पंचायत समितीचे संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे १७ जुलै रोजी प्रकरण जैसे थे राहिले. 

१८ जुलै रोजीही फारशा हालचाली न झाल्याने सतीश शिंदे यांच्यासह नारायण शिंदे, किशोर शिंदे, विजय कांबळे, बाळू शिंदे, संजय शिंदे, राजू शिंदे आदींनी मुदतबाह्य झालेलं अन्नधान्य थेट एका वाहनात टाकून पंचायत समिती कार्यालय गाठले. गटविकास अधिकारी कार्यालयात उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांनी प्रभारी एकात्मिक बालविकास अधिकारी संतोष जाधव यांना भेटून निवेदनाद्वारे या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली.

दरम्यान अंगणवाडीत हा आहार साठलेला होता. यातील काही पाकिटे मुलांना वाटण्यात आल्याचा दावा संतोष जाधव यांनी केला आहे. परंतु २०१९ पासून ते २०२२ पर्यंतचा बहुतांश पोषण आहार हा वाटप न करता अंगणवाडीत पडून होता. परिणामी तो सडून गेला. याचाच अर्थ अंगणवाडी सेविका मुलांना आहार वाटप न करता सडेपर्यंत डांबून ठेवून वाया घालवतात. हे यातून समोर आले आहे. 

लाखोंच्या अन्नधान्याची अशी विल्हेवाट 

मुलांच्या सकस पोषण आहारावर शासन लाखो रुपये खर्च करते अन् अंगणवाडी सेविका या आहाराची अशा पध्दतीने सडून त्याची विल्हेवाट लावत असतील तर ही गंभीर बाब म्हणावी लागेल. आहार वाटपाची काय स्थिती आहे? हे पाहण्याची जबाबदारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांपासून ते अंगणवाडी पर्यवेक्षिकांची आहे. परंतु बहुतांश पर्यवेक्षिका जिल्ह्याच्या ठिकाणाहून ये-जा करतात. त्यामुळे त्यांना अंगणवाड्यांकडे जायला वेळ नाही. एकोडीसागजच्या अंगणवाडी सेविकेने मुदतीत आहार वाटप न केल्याने तो मुदतबाह्य होऊन सडला गेला. या वृत्ताला एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. या आहाराचा ठपका ठेवून अंगणवाडी सेविकेला नोटीस बजावून तिला पदावरून कमी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

एकोडीसागजच्या अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहार आढळून आला. हे खरे आहे. सेविकेच्या हलगर्जीपणामुळे हा आहार वाटप न होता तसाच पडून राहिला. त्यातूनच काही आहार मुलांना वाटप झाला. याप्रकरणी सेविकेला नोटीस काढण्यात आली असून तिला पदावरून कमी करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

- संतोष जाधव, प्रभारी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी, वैजापूर