Hot Posts

6/recent/ticker-posts

IPS Birdev Done | यशाला गवसणी: मेंढपाळाचं पोरगं झालं IPS; निकाल लागला तेव्हाही 'तो' चारीत होता मेंढ्या

 परिस्थितीवर मात करीत गाठले ध्येय 


कुणाचं नशीब केव्हा फळफळेल हे सांगता येत नाही. नशीब म्हणण्यापेक्षाही स्वतःचं कर्तृत्व माणसाला मोठं करतं. हे म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. जिद्द, चिकाटी आणि मेहनत करायची तयारी असेल तर यशाला गवसणी घालता येते. आपलं ध्येय ठरलेलं असेल तर परिस्थितीवरही मात करता येते. ध्येयासाठी अनेक मार्ग शोधा. परंतु ध्येय बदलू नका. हेच दाखवून दिले आहे एका मेंढपाळाच्या कर्तृत्ववान मुलाने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळविले आहे. त्याच्या जिद्दीला सलाम..! असंच काहीसं म्हणावं लागेल.


आईवडील दोघेही मेंढपाळ. कुटुंबाचे अर्थकारणच या भटक्या जीवनशैलीवर अवलंबून असल्याने तोही मेंढ्यांच्या मागे दिवसभर वणवण भटकत होता. मात्र, मंगळवारी दुपारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचा ( UPSC ) निकाल जाहीर झाला अन् या वणवण भटकणाऱ्या पोराला शोधण्यासाठी मान्यवरांची अक्षरशः धांदल उडाली. बिरूने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वा रॅंक पटकावत यशाचा झेंडा फडकवला. बिरदेव सिद्धाप्पा डोणे (IPS Birdev Done) असे या पोराचे नाव आहे. 

यमगे (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील मेंढपाळ कुटुंबात जन्मलेल्या बिरदेवने गावातील शाळेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. मराठी शाळेच्या व्हरांड्यातच तो अभ्यास करायचा. दहावीच्या परीक्षेत ९६ टक्के गुण मिळवून तो मुरगूड केंद्रात पहिला आला. मुरगूड येथील शिवराज कॉलेजमध्ये त्याने बारावी विज्ञान शाखेत ८९ टक्के गुण मिळवत मुरगूड केंद्रात पहिला येण्याचा बहुमान पटकावला. 

त्यानंतर त्याने पुण्याच्या सीओड़पी येथे स्थापत्य विभागात उच्च शिक्षण पूर्ण केले. पुढे दोन वर्षे दिल्लीत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. त्यानंतर पुणे येथे परीक्षेसाठी अभ्यास सुरू केला. आतापर्यंत दोन वेळा परीक्षा देऊनही त्यात त्याला यश आले नाही. मात्र, तिसऱ्यावेळी त्याने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत यश खेचून आणले. 

परिस्थिती कशीही असो ध्येयासाठी एकदा मनाशी खूणगाठ बांधली की ते पूर्णत्वास जातेच. हे बिरूने दाखवून दिले. दरम्यान नियमित पुस्तकांचे वाचन आणि अभ्यासातील सातत्यामुळेच मला हे यश मिळाले. वडील सिदाप्पा व आई-बाळाबाई यांच्या कष्टामुळेच मला हे यश मिळाले. त्यांच्या कष्टाशी आयुष्यभर प्रामाणिक राहूनच सेवा करीन. बिरदेव डोणे म्हणाला.

पोराच्या कष्टाचं चीज झालं!

परीक्षेच्या दिवशी माझी तब्येत बिघडली होती, छोटी शस्त्रक्रिया झाली होती अशा अवस्थेत बिरूने परीक्षा दिली आणि आज निकाल लागला. पोरानं लय कष्ट केलं आहे. आज त्याचं चीज झाल्याची भावना वडील सिद्धाप्पा यांनी बोलून दाखवली.

बुद्धीमत्ता कुणाची मक्तेदारी नाही 

Upsc परीक्षेसाठी लाखो रुपये खर्च करून शिकवणी लावणारे विद्यार्थी, कोणतेही शहरी अथवा शिकण्यासाठी घरात वातावरण नसताना बिरूने जे करून दाखविले. ते निश्चितच कौतुकास्पदच नव्हे तर आदर्शवत आहे. ग्रामीण भागातही गरीबांच्या घरात बुध्दीमत्ता आहे आणि बुद्ध्यांक, बुद्धी, हुशारी कुणाचीच मक्तेदारी नसते. हे यातून शिकायला मिळते.