अपहाराचे पुरावे नष्ट करण्यासाठीच कांड
वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक (Maharashtra Gramin Bank Vaijapur) फोडण्याचा प्रयत्न करून तिला आग लावून जाळून खाक करणाऱ्या पाचजणांच्या टोळीला पकडून पोलिसांनी जेरबंद केले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड वैजापूर तालुक्यातील वीरगाव ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंचासह पाचजणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अक्षय ज्ञानेश्वर कराळे (वय २८ वर्षे रा. करंजगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर ), भरत शिवाजी कदम रा. वीरगाव ता. वैजापूर), सचिन सुभाष केरे वय २५ वर्षे), वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे ( वय २७ वर्षे दोघेही रा. गवळीशिवरा ता. गंगापूर), धारबा बळीराम बिराडे (वय ३१ वर्षे रा. अंधोरी ता. अहमदपूर जि. लातूर) अशी जेरबंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
वैजापूर शहरातील फुलेवाडी रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला चोरीच्या प्रयत्नात आग लागून बॅंक जळून खाक (Bank fire in Vaijapur) झाल्याची घटना २० एप्रिल रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली होती. या घटनेत एटीएमकार्ड, चेकबुक, डी.डी.बुक, कर्ज संचिका, कॅश व्हाउचर, कम्प्युटर, युपीएस, फर्निचर व दैनंदिन व्यवहाराचे कागदपत्रे जळून १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. चौघेही चोरटे स्विफ्ट कारने आले होते. सुरवातीला गॅस कटरने बॅंक फोडण्याच्या प्रयत्नात स्फोट होऊन बॅंकेला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. त्यानुसार पोलिसांनी या वेगवेगळ्या दिशेने घटनेचा तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे या घटनेत चोरट्यांनी रक्कम अथवा सोन्याचे दागिने अशा कोणत्याही वस्तूंना हात लावला नव्हता. त्यामुळे हा धमाका कोणत्या उद्देशाने करण्यात आला? या दिशेने पोलिसांचा तपास आणि खल सुरू होता.
चोरट्यांच्या जप्त केलेल्या कारमध्ये पेट्रोलसह काही ज्वलनशील पदार्थ आढळून आले होते. याशिवाय बनावट नंबर प्लेट, कोयते, मास्क असे साहित्य आढळून आले होते. गुन्ह्यात वापरलेले वाहन नेमके कोणाच्या मालकीचे याचाही पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला.
घटनेनंतर न्यायवैद्यक (फाॅरेन्सिक) पथकासह अंगुलीतज्ज्ञ, श्वानपथकही येऊन गेले. मुळात हा स्फोट कशाने घडवून आणला? याची खातरजमा पोलिसांना होत नव्हती. परंतु पोलिसांनी गेल्या तीन दिवसांत तपासाची चक्रे जलदगतीने फिरवून या प्रकरणाचा छडा लावला अन् बॅंक जाळणारे अखेर जेरबंद केले. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याची माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, बॅंक जाळल्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ, सहायक पोलीस निरिक्षक पवन इंगळे यांचे पथक तपास करीत असतांना घटनास्थळी मिळून आलेली स्विफ्ट गाडीची तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेटस मिळून आल्या. त्याअनुषंगाने माहिती घेतली असता डिक्कीमध्ये सापडलेली नंबर प्लेट क्रमांक एम.एच. ०४ डी.डब्ल्यु. ४५११ ही ओमसाई आॅटो कन्सल्टिंगकडून (मालेगाव जि. नाशिक) विक्री झाल्याचे समजले. त्यानुसार पथकाने मालेगाव येथे जावून या वाहनाची माहिती घेतली असता वाहन खरेदी करताना संबधितांनी बनावट नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता दिल्याचे समजले.
२१ एप्रिल रोजी गोपनीय व तांत्रिक माहितीआधारे अक्षय ज्ञानेश्वर कराळे (वय २८ वर्षे रा. करंजगाव ता. वैजापुर जि. छत्रपती संभाजीनगर) याचा शोध पोलिसांनी घेवून त्याला ताब्यात घेतले. या घटनेबाबत त्याला विचारपूस केली असता त्याने भरत शिवाजी कदम (रा. वीरगाव ता. वैजापूर ) याच्यावर वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेतून बनावट कागदपत्राआधारे अपहार केल्याप्रकरणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
त्याचा राग मनात धरून बदला घेण्यासाठी भरत कदम याच्या सांगण्यावरून ३ एप्रिल २०२५ रोजी माझ्यासह भरत कदम, सचिन सुभाष केरे, वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे ( दोघे रा. गवळीशिवरा ता. गंगापूर ) असे चौघेजण मालेगाव येथील ओमसाई आॅटो कन्सल्टिंगकडे जावून स्विफ्ट व्हीडीआय कार ( क्रमांक एम.एच. ०४ डी.डब्ल्यू. ४५११) १,५५०००/- रुपयामध्ये विकत घेतली . कार घेतांना वाहन डिलेव्हरी चालानवर वाहन खरेदी करणाऱ्याचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक हे चुकीचे दिले होते.
दरम्यान २० एप्रिल २०२५ रोजी वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरी करून जाळण्याच्या उद्देशाने भरत कदम, सचिन सुभाष केरे, वैभव उर्फ गजू पंढरीनाथ केरे, धारबा बळीराम बिराडे, अप्पा बालाजी वने यांना सोबत घेऊन या घटनेला परिणाम दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
भरत कदम याच्या सांगण्यावरूनच बॅंक जाळल्याचेही त्याने नमूद केले. याप्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. दरम्यान पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश वाघ, सपोनि पवन इंगळे, भागीनाथ आहेर, विठ्ठल डोके, वाल्मिक निकम, शिवानंद बनगे, अशोक वाघ, दीपक सुरोशे, राहुल गायकवाड, योगेश तरमाळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
चोरटेही भाजले
बॅंक लुटण्यासह जाळण्याच्या प्रयत्नात धारबा बळीराम बिराडे या चोरट्याचे नाक भाजले तर अप्पा बालाजी बने फरार असून तोही या घटनेत भाजला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
'सत्यार्थी'चे वृत्त खरे ठरले!
दरम्यान या घटनेला वीरगाव ग्रामपंचायतीच्या ६४ लाखांच्या अपहाराची किनार आहे. प्रकरण रफादफा करण्याच्या उद्देशाने हे कांड घडवून आणल्याची चर्चा सुरू असल्याचेही सत्यार्थीच्या वृत्तात म्हटले होते. अखेर तो अंदाज खरा ठरला.
काय आहे नेमकं प्रकरण?
भरत कदम या वीरगाव ग्रामपंचायतीचा माजी उपसरपंच असून त्याने ग्रामपंचायतीचे खोटे कागदपत्रे वैजापूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत सादर करून जवळपास ६४ लाखांचा अपहार केला आहे. त्याने बॅंकेबरोबरच ग्रामपंचायतीच्या डोळ्यात 'धुळफेक' करून फसवणूक केली. याप्रकरणी वीरगाव पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला साधारणतः सहा महिने तुरुंगाची हवा खावी लागली. नंतर तो जामीनावर सुटून बाहेर आला. हे प्रकरण रफादफा करण्यासाठीच हे जळीतकांड घडवून आणल्याचे बोलले जात आहे.
Social Plugin