सोयीसुविधांनी असेल अद्ययावत
वैजापूर शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर - नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील हुतात्मा जगन्नाथ भाजी मंडईच्या कामाचे भूमिपूजन आमदार रमेश बोरनारे यांच्याहस्ते पार पडले. नगरविकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेले पाच कोटी रुपये या कामावर खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान गेल्या काही वर्षांपासून भग्नावस्थेत असलेल्या या भाजी मंडईला यानिमित्ताने पुन्हा 'झळाळी' येणार आहे.
शहरातील गांधी मैदानालगत असलेल्या पालिकेने उभारलेल्या हुतात्मा जगन्नाथ भाजी मंडईची इमारत जुनी होऊन जीर्ण झाली होती. भाजी मंडईची जुनी इमारत पाडून त्या जागेवर नवीन इमारत व्हावी व भाजी मंडई पुन्हा त्याच ठिकाणी सुरू व्हावी यासाठी आ. रमेश बोरनारे यांनी उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे भाजी मंडईच्या नवीन इमारत बांधकामासाठी पाच कोटींचा निधी मंजूर केला. भाजी मंडईच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आ. बोरनारे यांच्याहस्ते करण्यात आले.
![]() |
वैजापूर येथील भाजी मंडईच्या भूमिपूजनप्रसंगी बोलताना आ. रमेश बोरनारे. |
नवीन इमारतीसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शहरातील व्यापारी व फळ विक्रेत्यांनी सत्कार केला. आ. रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, डॉ. राजीव डोंगरे आदींची यावेळी भाषणे झाली.
शहर व तालुक्याच्या विकासासाठी आपण कटिबध्द असल्याचे आ. बोरनारे यावेळी म्हणाले. माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनीही आपल्या भाषणात आ. बोरनारे यांनी शहराच्या विकासासाठी आतापर्यंत जवळपास दीडशे कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करून आणला असून आ. बोरनारे यांच्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात विकासाची कामे झाल्याचे सांगितले.
कार्यक्रमास शहरप्रमुख राजेंद्र साळुंके, भाजपचे तालुकाध्यक्ष नारायण कवडे, व्यापारी संघटनेचे प्रकाश बोथरा, काशिनाथ गायकवाड, शोभाचंद संचेती, बाबुलाल संचेती, गौरव दोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
कशी असेल नवीन भाजी मंडई?
आमदार बोरनारे म्हणाले की, जुन्या भाजी मंडईची नव्याने पुनर्बांधणी केली जाईल. ज्यामध्ये ५८ दुकानांची व्यवस्था केली जाईल. प्रथम माती भरली जाईल, नंतर इंटरलॉकिंग टाइल्स टाकल्या जातील. ४४ प्लॅटफॉर्म बनवून दुकाने दुकानदारांना वाटप केली जातील. यासोबतच शौचालये, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था आणि अन्य मुलभूत सुविधा देखील विकसित केल्या जातील. ही बाजारपेठ केवळ व्यापाऱ्यांसाठी सोयीस्कर होणार नाही तर शहरवासीयांना वाहतूक कोंडीतूनही दिलासा मिळेल.
आमदार बोरनारे यांचा पुढाकार
सध्या शहरातील येवला रस्त्यावर भाजी मंडई भरते. या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीसह नागरिक व विक्रेत्यांमुळे दररोज प्रचंड गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. पाच मिनिटांच्या प्रवासात नागरिकांना वीस मिनिटे लागतात. परिणामी सामान्य नागरिकांसह व्यापाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यापूर्वी शेतकरी भाजीपाला विकण्यासाठी जुन्या भाजी मंडईत भाजीपाला विक्रीसाठी येत असत. परंतु जागेची कमी उपलब्धता, रहदारी आणि विक्रेत्यांच्या दादागिरीमुळे राष्ट्रीय महामार्ग जाम होतो. वाहतूक कोंडी, अपघात व जागेचा अभाव या सततच्या तक्रारींनंतर आमदार रमेश बोरनारे यांनी स्वतः पुढाकार घेत ही समस्या सोडवण्याचा निर्णय घेतला व जुनी मंडई उभारण्याचा निर्णय घेतला.
Social Plugin