लाचलुचपत प्रतिबंधक पथकाची कारवाई
छत्रपती संभाजीनगर: भोगवटदार वर्ग जमिनीच्या कार्यवाहीसाठी तब्बल पाच लाख रुपयांची लाच घेताना महसूल सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. निवासी उपजिल्हाधिकाऱ्याच्या सांगण्यावरून ही रक्कम स्वीकारण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान एवढ्या मोठ्या रकमेच्या लाच प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी विनोद गोंडुराव खिरोळकर ( वय ५१, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर) व महसूल सहाय्यक अशी लाचखोरांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदारासह त्यांच्या भागीदाराची छत्रपती संभाजीनगर परिस्थितीत मौजे तिसगाव येथील ६ एकर १६ गुंठे जमीन ही वर्ग २ ची असल्याने ही जमीन शासनाची परवानगी घेऊन सर्व नियमानुसार खरेदी खत करून सन २०२३ मध्ये विकत घेतली आहे. सदर जमीन ही वर्ग २ ची असल्याने ती खरेदी करण्यासाठी शासनास लागणारे चलन जनरेट करून देण्यासाठी महसूल सहाय्यक व निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर (Resident Deputy Collector Vinod Khirolkar, Chhatrapati Sambhajinagar) या दोघांनी २३ लाख रुपये मागणी केली होती.
त्यामुळे तक्रारदाराने २३ लाख रुपये दिले होते. सदर जमीन वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये करण्यासाठी नजराणा शुल्क शासनास पुन्हा भरावयाचा असल्याने त्यासाठी लागणारे चलन पुन्हा जनरेट करून देण्यासाठी दोघांनीही तक्रारदार व त्यांच्या भागीदाराकडे लाच म्हणून १८ लाख रुपयांची मागणी करीत होते. अशी तक्रार २३ में २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे करण्यात आली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने याबाबत पडताळणी केली असता महसूल सहाय्यकाने खिरोळकर याने १८ लाख रुपये घेण्याचे सांगितले.
याशिवाय २६ मे रोजी खिरोळकर याच्या दालनात तक्रारदारासह खिरोळकर व महसूल सहाय्यकामध्ये लाचेच्या रकमेबाबत बोलणे झाले. त्यानुसार पाच लाख रुपये अगोदर व उर्वरित १३ लाख रुपये संचिका पूर्ण झाल्यानंतर देण्याचे ठरले.
दरम्यान २७ मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून महसूल सहाय्यकास तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर याला पोलिसांनी लगेचच ताब्यात घेतले. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
लाखोंत चालते 'खाबुगिरी'
दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीचे प्रकरण ताजे असतानाच खिरोळकर याची लाचखोरी उघडकीस आली. याचाच अर्थ या कार्यालयात भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात बोकाळला. याची प्रचीती येते. एकंदरीत 'खाबुगिरी'चे व्यवहार लाखोंत चालतात. हेही झाकून राहिले नाही.
Social Plugin