कर्मचाऱ्याला बजावली होती नोटीस
वैजापूर: येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून एक कर्मचारी अचानक 'आऊट ऑफ कव्हरेज' झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याने घरी एक चिठ्ठी लिहून गटविकास अधिकाऱ्याच्या व्हाॅट्सअॅपवर मेसेज टाकला आहे. दरम्यान या घटनेमुळे सटपलेल्या गटविकास अधिकाऱ्यासह सहायक गटविकास अधिकाऱ्यानी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली.
शिवदास परसराम घोगरे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार, येथील पंचायत समितीच्या एका कर्मचाऱ्याला प्रलंबित कामामुळे अधिकाऱ्यानी नोटीस बजावली होती. परंतु कामाचा ताण जास्त असल्यामुळे ते काम करण्यास कर्मचारी असमर्थ ठरत होता. त्यामुळे या वैतागलेल्या कर्मचाऱ्याने घरी चिठ्ठी लिहून गटविकास अधिकाऱ्यानाही मेसेज टाकला.
या कर्मचाऱ्याने चिठ्ठीत स्पष्ट काही लिहिले नसलं तरी काहीअंशी 'सूचक' इशारा दिला आहे. या वृत्तास पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. दरम्यान कार्यालयीन कामकाजातून हे मोठे गंभीर नाट्य घडले आहे. गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांच्या व्हाॅट्सअॅपवर मेसेज येऊन धडकल्यानंतर त्यांनी सहायक गटविकास अधिकारी अक्षय भगतसह वैजापूर पोलिस ठाणे गाठले व पोलिसांना व्हाॅट्सअॅपवर आलेला मेसेज दाखविला. परंतु त्या मेसेजमध्ये गुन्हा दाखल करावा. असा कोणताही मजकूर नाही. त्यामुळे नेमका काय निर्णय घ्यावा? याबाबत पोलिस यंत्रणा संभ्रमात आहेत.
परंतु असे असले तरी गटविकास अधिकाऱ्यासह सहायक गटविकास अधिकारी चांगलेच भांबावून गेले असल्याचे पोलिस ठाण्यात दिसले. याबाबत गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांच्याकडून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी 'हा माझा खासगी विषय असल्याचे' सांगून पत्रकारांना माहिती देण्याचे टाळले तर दुसरीकडे सहायक गटविकास अधिकारी भगतांनी हा विषय काही माध्यम प्रतिनिधींना माहिती असून त्यांच्याकडून माहिती घ्या. असे सांगून कातडीबचाव धोरण स्वीकारले.
बीडीओंसह सहायक बीडीओंनी पोलिस ठाण्यात लेखी दिले. परंतु त्यात नेमकं काय लिहिलेलं आहे? याचा उलगडा मात्र होऊ शकला नाही. सध्या पंचायत समितीचा कर्मचारी नेमका कुठे आहे? याचा थांगपत्ता ना पंचायत समिती अधिकाऱ्यांना आहे ना त्याच्या घरातील सदस्यांना! परंतु तो सध्या गायब असून त्याचा मोबाईलही आऊट 'ऑफ कव्हरेज' असल्याचे सूत्रांनी सांगितले.
परंतु प्रकरण गंभीर आहे. एवढे मात्र नक्की! दरम्यान याप्रकरणी कर्मचाऱ्याची पत्नी प्रियंका घोगरे यांनी वैजापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. या तक्रारीतही नोटीसचा उल्लेख करण्यात आला आहे.
Social Plugin