देयक काढण्यासाठी घेतली रक्कम
वैजापूर: जलसंधारण योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या शेततळ्याच्या बिलाचे हप्ते मिळण्यासाठी शेतकऱ्याकडून ३५ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कृषी सहायकास छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २३ जुलै रोजी रंगेहाथ पकडले.
जगदीश गेनुदास गवळी (४१,पद कृषी सहायक नारळा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय वैजापूर, रा. विनायक कॉलनी वैजापूर) असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील तक्रारदार यांचे तालुक्यातील नारळा शिवारात शेत गट क्रमांक २०७ मध्ये शेतजमीन आहे. दरम्यान त्यांना जलसंधारण योजनेतंर्गत शेततळे मंजूर झाले होते.
या शेततळ्यासाठी त्यांना २ लाख २५ हजार रुपये मंजूर झाले होते. मात्र त्या बिलाचे हप्ते त्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी कृषी सहायक जगदीश गवळी याने ३० हजार रुपये घेतले होते. मंजूर बिलाचे हप्ते खात्यावर कधी जमा होतील याची विचारणा करण्यासाठी तक्रारदार यांनी गवळी याच्याशी संपर्क साधला असता त्याने त्यांच्याकडे पुन्हा ५ हजार रुपये इतक्या लाचेची मागणी केली.
परंतु लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाप्रवि पथकाने जगदीश गवळी यास बुधवारी पाच रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. सदरची कारवाई लाप्रवि पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, अतिरिक्त प्रभारी अप्पर पोलिस अधीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाप्रविचे पोलिस निरीक्षक धनराज बांगर, पोलिस निरीक्षक वाल्मिक कोरे, पो. ह, राजेंद्र जोशी, युवराज हिवाळे, सी.एन.बागुल यांच्या पथकाने केली.
Social Plugin