Hot Posts

6/recent/ticker-posts

Gram Panchayat embezzlement | 'त्या' ३४ लाखांच्या अपहारावर अखेर शिक्कामोर्तब; बेखबर अधिकाऱ्यांना आमदारांची तंबी, ग्रामपंचायतींना नोटीस

खासगी ऑपरेटरचा प्रताप

वैजापूर तालुक्यातील १२ ग्रामपंचायतीच्या खात्यांवरून ऑपरेटरने ३४ लाख रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचा खळबळजनक उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून याबाबीची चर्चा तालुक्यात सुरू असताना दुसरीकडे पंचायत समिती प्रशासन मात्र बेखबर होते. परंतु आता दस्तूरखुद्द गटविकास अधिकाऱ्यांनी या अपहारास दुजोरा देऊन शिक्कामोर्तब केले आहे. दरम्यान आज आमदार रमेश बोरनारे यांनी पंचायत समितीत जाऊन 'या प्रकरणात दोषी असणाऱ्यांना पाठीशी घालू नका' अशी तंबीच अधिकाऱ्यांना दिल्याने प्रशासन कामाला लागले असून संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस काढण्यात आली आहे.


वैजापूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या १२ ग्रामपंचायतींचे ३४ लाख १५ हजार ५९२  रुपये ऑपरेटरने स्वतःच्या खात्यात वळवून अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे पंचायत समिती कार्यालयात खळबळ उडाली आहे. शासनाच्या विविध योजनांचा निधी ग्रामपंचायतीला शासनाकडून देण्यात येतो. हा निधी डीएससीद्वारे ( डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट) संबंधित काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतो. ग्रामपंचायतसाठी डीएससी म्हणजे एक प्रकारे एटीएम कार्ड असते. सरपंच व ग्रामसेवक यांच्या नावाने ही डीएससी असते. गटविकास अधिकांऱ्यांचाही या डीएससीशी अप्रत्यक्षपणे संबंध असतो. सरपंच, ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांना प्रत्येक व्यवहार झाल्यानंतर संदेश मिळतो. वेगवेगळ्या योजनांच्या निधीचे वाटप करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या खासगी ऑपरेटरकडून काम करून घेते. कामांची रक्कम वाटप करताना तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या ३४ लाख १५ हजार ५९२ रुपयांचा निधी एका खासगी ऑपरेटरने स्वतःच्या बॅंक खात्यामध्ये वळवून घेतला. ज्यांचे देणेघेणे आहे; अशांनी ग्रामपंचायतींकडे चकरा मारणे सुरू केल्यावर हा अपहार उघडकीस आला. दरम्यान या अपहारावर गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर यांनी दुजोरा देऊन शिक्कामोर्तब केले आहे. या अपहाराच्या अनुषंगाने संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस काढण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रमेश बोरनारे यांनीही कार्यालयात जाऊन जाब विचारला व कुणालाही पाठीशी घालता कामा नये. असे सांगून याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत.

कोणत्या आहेत ग्रामपंचायती?

अपहाराचा भांडाफोड झाल्यानंतर संबंधित ऑपरेटरने रक्कम भरल्याची चर्चा असला तरी या वृत्ताला अधिकृत कुणीही दुजोरा दिला नाही. यूटीआर क्रमांकाशिवाय रक्कम जमा केल्याची खात्री होणार नाही. असे बीडीओंनी सांगितले. अपहारात तालुक्यातील चोरवाघलगाव, हाजीपूरवाडी, आंचलगाव, रघुनाथपूरवाडी, मनेगाव, खरज, भिवगाव, अव्वलगाव, सटाणा, भग्गाव, बेलगाव, वडजी या ग्रामपंचायत असण्याची  शक्यता वर्तवली जात आहे.

बीडीओ, एबीडीओ बेखबर!

दरम्यान तालुक्यात सामान्य नागरिकांसह कार्यकर्त्यांमध्ये या बाबीचे चर्वितचर्वण सुरू असताना दुसरीकडे गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांना खबर नव्हती. याचाच अर्थ प्रशासनातील अधिकारी किती 'अलर्ट' आहेत आणि कर्तव्याप्रती ते किती गंभीर आहेत? याची प्रचीती येते. यासंदर्भात सहायक गटविकास अधिकारी अक्षय भगत यांच्याशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, 'याबाबत आमच्याकडे काहीही माहिती अथवा तक्रार आलेली नाही' असं 'सरकारी' उत्तर देऊन मोकळे झाले. अपहाराचे आकडे बाहेरपर्यंत गेलेले असताना अधिकाऱ्यांची 'आकडेमोड' सुरूच होती.

ऑपरेटरने ग्रामपंचायतींच्या खात्यावरून ३४ लाख १५ हजार ५९२ रुपये स्वतःच्या खात्यावर वळविले. याबाबत शिक्कामोर्तब झाले आहे. या अनुषंगाने १२ ग्रामपंचायतींना नोटीस बजावण्यात आली आहे.

- श्रीकृष्ण वेणीकर, गटविकास अधिकारी, वैजापूर

१२ ग्रामपंचायतींच्या बॅंक खात्यावरून ३४ लाख रुपये वळवून घेतल्याची माहिती मला मिळाली. त्यामुळेच मी कार्यालयात आलो. कुणी काहीही करत असेल तर हे चालणार नाही. गटविकास अधिकाऱ्यांनी कुणाला पाठीशी न घालण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे चौकशीनंतर सर्व प्रकार समोर येईल. परंतु अपहार झाला. हे नक्की.

- प्रा. रमेश बोरनारे, आमदार, वैजापूर