त्याचे झाले असे की, शहरातील गांधी मैदानालगत असलेल्या हुतात्मा जगन्नाथ भाजी मंडईच्या कामाचे भूमिपूजन शिवसेनेचे मुख्य प्रतोद तथा आमदार रमेश बोरनारे (Shivsena MLA Ramesh Bornare) व माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर Former MLA Bhausaheb Patil Chikatgaonkar) उभयतांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
अगोदर आमदार बोरनारेंचे भाषण झाले. तद्नंतर चिकटगावकर भाषणाला उभे राहिले अन् 'एवढं सगळं झाल्यानंतर मी काय बोलावं? असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी थोडा 'पाॅज' घेतला. तोपर्यंत उपस्थितांनीही श्वास रोखून ठेवला. चिकटगावकरांनी पुन्हा त्याच खर्जातील आवाजात उपस्थितांमधील बोलण्याचा धागा पकडून 'त्याची व्यवस्था अशी आहे की, ज्याला निवडणुकीत उभ राहू द्यायचं नाही, त्याला शेवटी बोलायला लावायचं' असं म्हणत त्यांनी बोरनारेंकडे कटाक्ष टाकल्याने बोरनारेंसह उपस्थितांमध्ये एकच 'हशा' पिकला.
चिकटगावकर इथेच थांबले नाही तर त्यांनी पुन्हा षटकार लगावला. ते म्हणाले की, "मला अगोदर बोलायची संधी मिळाली असती तर म्हणावं लागलं असतं की, मुंबईत आमदारांनी खूप छान काम केलं. आता त्यांना दिल्लीची गरज आहे (हशा). आता दिल्लीत काम करायला पाठवलं पाहिजे. अशा माणसांची तेथे गरज आहे. परंतु त्यांना दिल्लीत अजून जायचं नाही, ते मुंबईत रमलेले आहेत. असं काही उलटसुलट बोलू नये म्हणून मला शेवटी बोलायला ठेवलं" असं म्हणताच पुन्हा एकदा कार्यक्रमस्थळी 'खसखस' पिकली अन् पुन्हा एकदा आमदारांसह उपस्थितांनी खळखळून दाद दिली.
चिकटगावकरांनी 'कोपरखळ्या' हाणल्या. परंतु दुसरीकडे बोरनारेंचे भरभरून कौतुक करायलाही त्यांनी कसर ठेवली नाही. 'भाजी मंडईच्या कामामुळे बोरनारेंना माता-भगिनींचा भरभरून आशीर्वाद मिळणार आहे. यापुढे भाजीपाला घेण्यासाठी भगिनींना होणारा त्रासही वाचणार आहे. टिळकपथ म्हणजे शहराचे 'हृदय' आहे. त्यामुळे सर्वच खरेदीच्या सुविधा एकत्र उपलब्ध होतील' असं सांगून त्यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने भाषण सुरू केले. परंतु सुरवातीच्या भाषणातून त्यांनी विनोदी शैलीतून ज्या कोपरखळ्या हाणल्या. त्यातून 'बोरनारेंनी दिल्लीत जावं अन् मला मुंबई पाठवावं' असाही एक लपलेला आणि सूचक अर्थ उपस्थितांनी काढला.
'निवडणूक लढू न देणाऱ्यांना शेवटी बोलू दिलं जातं' या त्यांच्या विधानात कुठंतरी 'शल्य' दिसून आलं. निवडणुकीच्या आठ महिन्यानंतरही ही 'बोच' दिसून आली. विधानसभा निवडणुकीत उबाठा शिवसेनेच्या नेतृत्वाने उमेदवारी नाकारल्याने चिकटगावकरांनी बोरनारेंना 'पाठबळ' देण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासूनच चिकटगावकर त्यांच्यासोबत आहेत. दरम्यानच्या काळात चिकटगावकरांनी शिंदेसेनेत प्रवेश केला होता. त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'तुमच्यावर लवकरच जबाबदारी सोपवली जाईल'. असे सुतोवाच केले होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी सोपवली गेली नाही.
'सुप्त' भावना अन् सहजता!
या कार्यक्रमाच्या निमित्ताने चिकटगावकरांच्या 'सुप्त' भावना उफाळून आल्या अन् तितक्याच सहजतेने त्यांनी बोलून दाखविल्या. असा अर्थही यातून राजकीय वर्तुळात काढला जात आहे. 'दिल्ली आणि मुंबई'च्या मुद्द्यांवर चिकटगावकरांनी सूचक विधान केले खरे. परंतु त्यांच्या म्हणण्यानुसार बोरनारे सध्या मुंबईतच 'रमलेले' आहेत. त्यामुळे त्यांचा सध्या दिल्लीत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही 'जबाबदारी' सोपविण्याचे आश्वासन दिलेले आहे. आमदार रमेश बोरनारे यांचे वैजापूकरांवरील असलेले 'प्रेम' पाहता ते दिल्लीत जातील. याची सध्या सुतराम शक्यता वाटत नाही. अवलोकन केल्यास खरी परिस्थिती हीच आहे. अशा परिस्थितीत 'निवडणूक लढू न देणाऱ्यांना शेवटी बोलू दिलं जातं' चिकटगावकरांची ही 'आर्त हाक' पक्षश्रेष्ठींच्या कानावर जाईल का? हा प्रश्न सध्या मात्र अनुत्तरीत आहे.
Social Plugin