Hot Posts

6/recent/ticker-posts

Nastanpur Incident | प्रेमप्रकरणास ग्रामस्थांचा विरोध; 'त्या' दोघांनी रेल्वेखाली उडी घेत संपवली जीवनयात्रा

नस्तनपूर शिवारातील दुर्देवी घटना 


 नांदगाव: प्रेमसंबंधांमुळे ग्रामस्थांकडून दिल्या जाणाऱ्या वारंवार धमक्यांच्या छळाला कंटाळून महिलेसह तिच्या प्रियकराने रेल्वेखाली उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना नाशिक जिल्ह्यातील नस्तनपूर ता. नांदगाव (Nastanpur Ta Nandgaon) येथे घडली. याप्रकरणी आयुष्य संपविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून १६ जणांविरुद्ध नांदगाव पोलिस ठाण्यात (Nandgaon Police Station)गुन्हा दाखल करण्यात आला  आहे


यासंदर्भात गोविद नवनाथ मिटके यांनी फिर्याद दिली असूनत्यात म्हटले आहे की , त्यांची बहीण उज्ज्वला रामकृष्ण खताळ (रा. वंजारवाडी, ता. नांदगाव) हिचे तिच्या गावातीलच ज्ञानेश्वर माधव पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गावातील काही जणांनी या संबंधांना विरोध करीत त्यांना वारंवार 'जीवनयात्रा संपवा' अन्यथा तुम्हाला संपवून टाकू. अशी धमकी दिली होती. त्यामुळे या सततच्या छळाला कंटाळून या दोघांनी आयुष्य संपविण्याचा निर्णय फिर्यादीत म्हटले आहे. 


व्हॉट्सॲपवरून भावाला दिली माहिती

उज्ज्वलाने तिच्या भावाला ११ मार्च २०२५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास व्हॉट्सॲपवर  चिठ्ठी पाठवली होती. त्यात तिने तिच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या १६ जणांच्या नावांचा उल्लेख केला आहे. भावाला व्हाॅटस्अॅपवर पाठविण्यात आलेल्या चिठ्ठीत उल्लेख केल्याप्रमाणे, त्या व्यक्तींनी तिच्यासह तिच्या प्रियकराला धमकावून त्यांना जीवनयात्रा संपविण्यास प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे.


कुठे घडली घटना?

दरम्यान  उज्ज्वला व ज्ञानेश्वर या दोघांनी नस्तनपूर शनि मंदिराजवळ रेल्वे पटरीवर जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवारी रात्री घडली. त्यानंतर कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचेही मृतदेह नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले.


१६ जणांविरुद्ध गुन्हा 

 उज्ज्वला व ज्ञानेश्वर यांच्या मृत्यूस जबाबदार ठरलेल्या १६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य मृत्यूस जबाबदार असणाऱ्यांच्या शोधात पोलिस आहेत.