सडलेले पोषण आहार प्रकरण
वैजापूर : एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या तालुक्यातील एकोडीसागज येथील 'त्या' अंगणवाडी सेविकेसह मदतनीसला सेवेतून कमी करण्याचा प्रस्ताव तर संबंधित पर्यवेक्षिकेस एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. दरम्यान येथील अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहार आढळून आल्याचे प्रकरण समोर आले होते. याचा ठपका सेविकेसह पर्यवेक्षिकेवर ठेवण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील एकोडीसागज येथील अंगणवाडीत मुदतबाह्य पोषण आहार असल्याचे प्रकरण ग्रामस्थांनी उघडकीस आणले होते. हा पोषण आहार मुदतबाह्य तर होताच. परंतु सडलेलाही होता. या प्रकरणानंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प विभाग खडबडून जागा झाला.
याच पार्श्वभूमीवर एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी संतोष जाधव यांनी अंगणवाडी सेविका मंजुश्री गीताराम पुजारीला सेवेतून कमी करण्याचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांना पाठविला आहे. पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे की, एकोडीसागज येथील अंगणवाडी सेविका व मदतनीस नेमून दिलेले कामकाज व्यवस्थितपणे पार पाडीत नसल्याचे दिसून आले आहे. मंजुश्री पुजारी या गेल्या १ वर्षापासून आजारी असल्याचे कारण सांगून अंगणवाडी केंद्रात उपस्थित नाहीत.
अनुपस्थित काळात त्यांनी कोणतेही वैदयकीय प्रमाणपत्र सादर केलेले नाही. संबंधित सेविकेने कोणत्याही प्रकारचे रेकॉर्ड अंगणवाडी केंद्रात ठेवलेले नाही. अंगणवाडी केंद्रातर्गत बालकांचे नियमित वजन उंची घेवून कुपोषण मुक्तीचे काम अंगणवाडी सेविकांनी करायचे असते. मंजुश्री पुजारी सेविका व मदतनीस स्वाती घुले दोघींनी मागील कित्येक वर्षांपासून लाभार्थ्यांचे वजन, उंची घेतलेले नाही. कुपोषण मुक्तीबाबत काहीच काम झालेले नाही. अंगणवाडी केंद्रास भेट देवून पाहणी केली असता सेविका व मदतनीसच्या कामात प्रचंड अनियमितता दिसून आली. त्यामुळे संबंधित सेविकेसह मदतनीसावर कार्यवाही करण्याबाबत शिफारस करण्यात येत आहे. असे प्रस्तावात म्हटले आहे.
पर्यवेक्षिकेलाही बजावली नोटीस
याच प्रकरणाचा ठपका ठेवून गाढेपिंपळगाव बीटच्या पर्यवेक्षिका कल्पना रावते यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसीत म्हटले आहे की, अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोघींचे अंगणवाडीतील कामकाज अत्यंत असमाधानकारक असून पर्यवेक्षकीय अधिकारी या नात्याने आपलेही कामकाज असमाधानकारक आहे. अंगणवाडी केंद्रास नियमित भेट देणे, त्रुटींबाबत संबंधितांना माहीती देणे, कामकाजाबाबत सविस्तर माहीती देणे. या बाबी आपल्या कामकाजात आवश्यक असतांना आपण ही कामे केलेअसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आपल्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित का करण्यात येवू नये? असा प्रश्न उपस्थित करून याबाबत खुलासा करण्यात यावा. असे नमूद करण्यात आले आहे.
Social Plugin