सभापतींवर तीव्र रोष
वैजापूर कृषी बाजार समितीच्या सर्वसाधारण मासिक सभेत सभापतींसह संचालकांचे कोणत्याही विषयावर एकमत न झाल्याने सभा गुंडाळण्याची नामुष्की ओढवली गेली. गेल्या काही दिवसांपासून सभापतींवर असलेला रोष पाहता आजच्या सभेत संचालकांनी कडाडून विरोध करीत विकासकामांना 'ब्रेक' लावला. परिणामी कोणत्याही विषयाला मंजुरी न देता 'गदारोळात' सभा तहकूब करावी लागली.
वैजापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची सोमवारी सर्वसाधारण मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. सभापती रामहरी जाधवांसह सर्व पक्षांचे संचालक या सभेला हजर होते. सुरवातीलाच तालुक्यातील शिऊर येथील उपबाजार समितीच्या संरक्षक भिंतीच्या कामाची निविदा होऊन तीन महिने उलटून गेले. या कामाचे काय झाले? याशिवाय शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या व आकारणीपोटी वसूल केलेल्या पैशांत तफावत कशी आढळून आली? तसेच अन्य तीन विषय होते. संचालकांनी एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती केल्याने सभापती रामहरी जाधव निरुत्तर झाले. त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.
सभेत गदारोळ सुरू झाल्याने सभापतींना सभा तहकूब करण्याची नामुष्की ओढवली गेली. परिणामी या सभेत कोणत्याही विषयाला मंजुरी न देता सभा तशीच गुंडाळली गेली. केवळ व्यापाऱ्यांना परवाने द्या. एवढ्या एकाच विषयावर संचालकांनी सहमती दर्शवली. उर्वरित विषयांना संचालकांनी 'कोलदांडा' घातला. दस्तूरखुद्द सभापती जाधवांनी सभेत काहीच झाले नसल्याची 'सारवासारव' केली खरी. परंतु सभा स्थगित करावी लागल्याची कबुली मात्र दिली. परंतु सभा का स्थगित केली? याचे उत्तर त्यांनी दिले नाही.
'कोंबड्याने बांग दिली नाही म्हणून तांबड फुटत नाही' अशातला भाग नसतो. त्यामुळे सभापतींनी कितीही 'झाकून' ठेवले तरी सत्यता बाहेर आल्याशिवाय राहत नाही. हे मात्र नक्की. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती व संचालकांमधील 'सौहार्दाचे' संबंध संपुष्टात आल्यासारखे आहेत. दोहोंमधील वाढती दरी विकासकामांना मारक ठरू लागली आहे.
बाजार समितीमध्ये शिवसेना - भाजप संचालकांची सत्ता आहे. परंतु विरोधकांसह स्वकीयांनी जेरीस आणल्याने सभापती हतबल झाले आहेत. वास्तविक पाहता संचालकांच्या वाढत्या रोषावर लगाम घालण्यास सभापतीही असमर्थ ठरले आहेत. संचालकांची नाराजी का आहे? याच्या खोलात जाण्याची गरज आहे.
ही 'उचलटाक' अशीच सुरू राहिल्यास शेतकऱ्यांच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या बाजार समितीची 'वाट' लागायला वेळ लागणार नाही. शेतकऱ्यांनी ज्या विश्वासाने निवडून दिले. तो विश्वास सार्थ करून दाखविण्याची जबाबदारी सभापतींसह सर्व संचालकांची आहे. केवळ 'वाटाघाटी'वरून हा 'खेळ' सुरू असेल तर हे शेतकऱ्यांचे दुर्देवं म्हणावे लागेल.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभेत काहीच झाले नाही. पण कोणत्याही विषयांना मंजुरी न देता सभा स्थगित करावी लागली.
- रामहरी जाधव, सभापती, कृउबा, वैजापूर
'राडा' आणि 'वस्त्रहरण'
सन २०२३ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली. त्यानंतर सर्व गुण्यागोविंदाने नांदले. परंतु आता माशी कुठे शिंकली? हे कळायला मार्ग नाही. तत्पूर्वीच्या संचालक मंडळाचेही अख्खे पाच वर्षे भांडण-तंट्यात गेले. दाखल केलेल्या अविश्वास ठरावापासून ते बारगळलेल्या अविश्वास ठरावाचा तमाशा अख्ख्या तालुक्याने बघितला. एवढेच नव्हे तर दोन माजी सभापतींत झालेला 'राडा' अन् शाई फेकण्यापासून ते 'वस्त्रहरण' (कपडे फाडाफाडी) करण्यापर्यंतचा प्रवास सर्वांनी बघितला. आता पुन्हा तोच कित्ता गिरवला जाणार असेल तर हा मतदारांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे शिवसेना -भाजप नेत्यांनी सभापतींसह संचालकांना समज देण्याची गरज आहे.
Social Plugin