Hot Posts

6/recent/ticker-posts

Supply Inspector Bribery Case | महिला पुरवठा निरीक्षक लाचेच्या जाळ्यात! ४० हजार घेताना पकडले रंगेहाथ

एसीबीच्या पथकाची कारवाई 


छत्रपती संभाजीनगर: रास्तभाव दुकानदाराकडून ४० हजार रुपयांची लाच घेताना गंगापूर तहसील कार्यालयातील महिला पुरवठा निरीक्षकास छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. दरम्यान निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी स्वतःसह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नावे तिने ही लाच घेतली.

  

कांचन नामदेवराव कांबळे (३४, पुरवठा निरीक्षक गंगापूर, रा. छत्रपती संभाजीनगर) असे या लाचखोर महिलेचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगापूर तालुक्यातील काटेपिंपळगाव येथील एका ३२ वर्षीय तक्रारदाराच्या आजोबाच्या नावे असलेले रास्त भाव दुकान वारसाने प्राधिकृत केलेले असून रास्त भाव दुकानाचे प्राधिकारपत्राचा निलंबन प्रस्ताव मागे घेण्यासाठी कांचन कांबळे हिने स्वतःसह जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासाठी ७० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली  होती.

 तक्रारदारास  लाच देण्याची इच्छा नसल्याने ते तक्रार देण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात १२ जून रोजी गेले होते. दरम्यान तक्रारीनंतर १३ जून रोजी तक्रारदाराने कांचन कांबळे हिच्याशी चर्चा करून तडजोडीअंती स्वतःसाठी १५ हजार व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यासाठी २५ हजार असे एकूण ४० हजार देण्याचे ठरले. 

त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर येथील सेवा कर भवन कार्यालयासमोर सापळा रचून कांबळे हिला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.